कल्याणमधील १४ गावे नवी मुंबई मनपा हद्दीत; ग्रामस्थांचा फटाके फोडून आनंदोत्सव

कल्याण तालुक्यातील खोणी गटात असणारी १४ गावे आता पुन्हा नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करणारी अधिसूचना शासनाने जारी केली आहे.
कल्याणमधील १४ गावे नवी मुंबई मनपा हद्दीत; ग्रामस्थांचा फटाके फोडून आनंदोत्सव
Published on

नवी मुंबई : कल्याण तालुक्यातील खोणी गटात असणारी १४ गावे आता पुन्हा नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करणारी अधिसूचना शासनाने जारी केली आहे. त्यानुसार आता ठाणे ग्रामीणअंतर्गत शिळफाट्यानजीक असणाऱ्या १४ गावांमध्ये शासनाच्या निर्देशानुसार विकासकामे करण्याबाबत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आदेश काढल्यामुळे या गावांमधील नागरिकांनी मंगळवारी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.

दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत सदर १४ महसुली गावांचा समावेश नवी मुंबई महापालिकेत करण्यात आला होता. मात्र, कर जास्त असल्याचे कारण देत स्थानिक ग्रामस्थांचा याला विरोध असल्याने या गावातून निवडून आलेले नगरसेवक अनंत कोळी यांची हत्या करून ग्रामस्थांनी नमुंमपा हद्दीत राहण्यास विरोध दर्शविला होता. यानंतर मालमत्ता कर वसुलीसह अन्य करांच्या वसुलीला ग्रामस्थांचा विरोध असल्याने १४ गावांतील हजारो रहिवाशांनी मोर्चाने थेट धडक देत महापालिका मुख्यालयावर दगडफेक केली होती. यानंतर ग्रामस्थांच्या प्रखर विरोधानंतर १४ गावे नवी मुंबई महापालिकेतून वगळण्यात आली होती.

यानंतर पुन्हा सदर गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करून घेण्यासाठी येथील ग्रामस्थांनी २०१५ पासून मागणी केली होती. त्यामुळे शासकीय पातळीवर गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याबाबत हालचाली सुरू होत्या. २०२२ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याबाबत निर्णय झाला. मात्र, त्याची अंतिम अधिसूचना काढण्यात आली नव्हती. यानंतर राज्यपालांच्या मंजुरीनंतर ७ मार्च २०२४ रोजी अधिसूचना काढण्यात आली आहे. खोणी गटात येणारी सदर गावे कल्याण आणि ठाणे निवडणूक क्षेत्रात होती. ऐन निवडणुकीच्या आधीच या गावांचा समावेश नवी मुंबई महापालिका हद्दीत करण्यात आला खरा; पण विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रात कोणताही बदल केल्याचे निर्देश देण्यात आलेले नाहीत. फक्त १४ गावे ठाणे जिल्ह्यातील खोणी गटातून वगळण्यात आल्याचे अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर १४ गावे पुन्हा नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्या अनुषंगाने आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार नवी मुंबई महापालिकेच्या वतीने आता येत्या १८ जुलैपासून १४ गावांमध्ये करावयाच्या विकासकामांसाठी शहर अभियंता विभागाने आराखडा तयार केला आहे. त्यासाठी निधीदेखील राखीव ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नमुंमपा लवकरच १४ गावांतील विकासकामांद्वारे गावांचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे बोलले जात आहे.

गावांमध्ये लवकरच विकासकामे

कल्याण तालुक्यातील १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट करावीत म्हणून १४ गाव विकास समिती, येथील ग्रामस्थ ८ वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करत होते. याबाबत २०२२ मध्ये निर्णय झाला होता. याबाबत अंतिम अधिसूचना काढण्यात आली नव्हती. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्याबाबत अंतिम अधिसूचना काढली गेली. त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश आले असून आमच्या गावांमध्ये लवकरच विकासकामे केली जाणार आहेत, असे १४ गावं विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी स्पष्ट केले.

या गावांचा समावेश

दहिसर, मोकाशी, वालिवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामार्ली, नारिवली, बाळे, नागांव, भंडारली, उत्तर शीव, गोटेघर.

logo
marathi.freepressjournal.in