मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे १८ वर्षीय तरुणीला जीवनदान

प्रसंगावधान राखत आपत्कालीन ब्रेक दाबून मोटरमन प्रशांत कोन्नूर यांनी या तरुणीचा जीव वाचवल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली
मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे १८ वर्षीय तरुणीला जीवनदान

मुंबईची लाईफलाईन अर्थात रेल्वे सर्वांसाठी जीवनवाहिनी. मात्र असे असले तरी काही प्रवासी मानसिक, आर्थिक तणावातून याच जीवनवाहिनीखाली येऊन आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रवाशांना ने-आण करणे ही ईश्वरसेवा मानून सुरक्षित रेल्वे चालवण्यासाठी पडद्यामागचे खरे हिरो असणाऱ्या मोटरमन्सनी अनेकदा अशा प्रवाशांना जीवनदान दिले आहे. मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून ७ मिनिटांच्या सुमारास देखील वाशी स्थानकातून सीएसएमटीच्या दिशेने निघालेल्या रेल्वेखाली येत एका १८ वर्षीय तरुणीने आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखत आपत्कालीन ब्रेक दाबून मोटरमन प्रशांत कोन्नूर यांनी या तरुणीचा जीव वाचवल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

उपनगरीय रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक अत्यंत महत्त्वाची समजली जाते. लाखो प्रवासी या रेल्वेमार्गे दैनंदिन प्रवास करतात. मात्र याच लाइफलाईनपुढे उभे राहत अनेक प्रवासी मानसिक तणावाखाली येत आत्महत्येचा प्रयत्न करतात. तर काही नागरिक पादचारी पुलाचा वापर न करता रूळ ओलांडत या फलाटावरून त्या फलाटावर ये-जा करतात. परंतु रेल्वेच्या वेगापुढे हे बेजबाबदार प्रयत्न जीवघेणे ठरत आहेत. अशा अनेक घटना सीसीटीव्हीत कैद झाल्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला अशा प्रवाशांच्या हालचाली टिपत मध्य रेल्वे मार्गावरील मोटरमन्सनी सतर्क राहत अनेक प्रवाशांचे जीव वाचवले आहेत. वर्षभरातील आकडेवारी पाहिली असता रेल्वे वाहतूक करणाऱ्या मोटरमन्सकडून तब्ब्ल २० हून अधिक प्रवाशांचे जीव वाचवण्यात यश आल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी असाच एक अपघात मोटरमनच्या सतर्कतेमुळे टळला असून याबाबत तरुणीचा जीव वाचवत घडलेल्या घटनेबाबत मोटरमन प्रशांत कोन्नूर आणि गार्ड संतोष कुमार यांनी तात्काळ रेल्वे प्रशासनाला माहिती दिली.

नेमकी घटना काय?

मंगळवार २२ नोव्हेंबर रोजी पनवेल - सीएसएमटी ही ट्रेन दुपारी २.०७ च्या सुमारास वाशी स्थानकातून मुंबईच्या दिशेने निघत होती. यावेळी किमी २९/१६ व २८/१४ मध्ये एक १८-१९ वर्षांची तरूणी सुरुवातीला रेल्वे रूळ ओलांडण्याचा बहाण्याने अचानक रेल्वे रुळांवर आडवी झोपली. मोटरमन प्रशांत कोन्नूर यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून आपत्कालीन ब्रेकचा वापर केला. काहीसा वेग घेतलेली लोकल तात्काळ थांबली असली तरी तरुणी मात्र थोडक्यात बचावली. कारण ब्रेक दाबल्यानंतर मोटरमन प्रशांत कोन्नूर यांनी खाली उतरून पहिले असता ती तरुणी रेलगार्ड आणि चाकाच्या मधोमध असल्याचे निदर्शनास आले. सुदैवाने आपत्कालीन ब्रेकमुळे ट्रेन सुरक्षितपणे तरुणीच्या जवळ थांबली. कोन्नूर यांनी त्या मुलीला सुखरूप रेल्वे रूळांवरून बाहेर काढत तरुणीची चौकशी केली असता ती तरुणी तुर्भे येथे राहत असून आत्महत्या करण्याच्या विचाराने ट्रॅकवर आली होती हे उघड झाले. वेळ न दवडता मोटरमन प्रशांत कोन्नूर यांनी तीला धीर देऊन त्याच गाडीतील पहिल्या महीला डब्ब्यात बसवले. डब्ब्यातील इतर महीलांना तीची काळजी घेण्यास सांगून त्यांनी पुन्हा गाडी सुरू केली. मानखुर्द रेल्वे स्थानकात रेल्वे आली असता मोटरमननी पुन्हा तीची विचारपूस करून तीला सुखरूप घरी जाण्यासाठी समजावले.

आम्ही कोणत्याही मेडल अथवा कौतुकासाठी काम करत नाही. प्रवाशांची सुरक्षा हे आमचे कर्तव्य आहे. मात्र मंगळवारी घडलेला प्रकार खूप भयानक होता. माझी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत चटकन तरुणी रेल्वे रुळांवर झोपली. मात्र काहीही असलं तारो तो एक जीव आहे वाचलाच पाहिजे. याच दृष्टीने मी माझी सर्व ताकद पणाला लावत आपत्कालीन ब्रेक मारला. मनात नकारात्मक विचार आणत जीवन संपवण्याचा प्रयत्न करू नये मी एवढेच या घटनेबाबत सांगेल.

- प्रशांत कोन्नूर, मोटरमन, पनवेल मुख्यालय

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in