आठ महिन्यांत रस्ते अपघातात नवी मुंबईत ‘१९५ मृत्युमुखी’

सर्व वाहन अपघातांमध्ये ६९ पादचाऱ्यांचा नाहक बळी गेला असून ८० पादचारी गंभीर जखमी देखील झाले आहेत
आठ महिन्यांत रस्ते अपघातात नवी मुंबईत ‘१९५ मृत्युमुखी’

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील विविध महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. यावर्षी जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये झालेल्या एकुण ४६८ अपघातांपैकी १९० प्राणांतिक अपघातात १९५ व्यक्तींना नाहक आपला जीव गमवावा लागला आहे. तर २८९ व्यक्ती या गंभीर जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे अपघातातील मृतांमध्ये दुचाकी अपघातांची संख्या (५४७) सर्वाधिक असून त्यात दुचाकीस्वारासह त्यांच्यासोबत असलेले सहप्रवाशी व पादचारी अशा एकुण ९७ जणांचा बळी गेला आहे. तसेच या सर्व वाहन अपघातांमध्ये ६९ पादचाऱ्यांचा नाहक बळी गेला असून ८० पादचारी गंभीर जखमी देखील झाले आहेत.

गत आठ महिन्यामध्ये दुचाकीच्या घडलेल्या एकूण २४७ अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या ९७ व्यक्तींमध्ये ६४ दुचाकीस्वार असून दुचाकीस्वाराच्या मागे बसलेल्या २७ व ६ पादचाऱ्यांचा दुचाकी अपघातामध्ये मृत्यू ओढवला आहे.

दुचाकी अपघातात मृत झालेल्यांपैकी बहुतेक दुचाकीस्वार हे स्वत:च्या चुकीमुळे रस्ता दुभाजकावर अथवा दुसऱ्या वाहनावर स्वत: धडकल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे आढळुन आले आहे. तसेच अज्ञात वाहन चालकाच्या धडकेत, ट्रेलरच्या धडकेत, तसेच कारच्या धडकेत काही दुचाकीस्वारांचा मृत्यू ओढवल्याचे समोर आले आहे.

तसेच गत ८ महिन्यात झालेल्या ७२ कार अपघातात २२ जण मृत्यूमुखी पडले असून त्यात १२ पादचाऱ्यांसह २ ड्रायव्हर व ८ कारमधील सहप्रवाशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ३४ अज्ञात वाहनांच्या अपघातात २८ पादचाऱ्यांचा नाहक बळी गेला असून १ ड्रायव्हर मृत्यूमुखी पडला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in