कोपरखैरणे परिसरातून २ बांगलादेशी अटकेत; एजंटलाही बेड्या

बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड बनवून घेतल्याचे उघड झाल्यानंतर हे बनवून देणारा एजंटलासुद्धा झाली अटक
कोपरखैरणे परिसरातून २ बांगलादेशी अटकेत; एजंटलाही बेड्या

कोपरखैरणे परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेलेल्या दोन बांगलादेशी नागरिकांना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने अटक केली आहे. या दोन्ही बांगलादेशी नागरिकांनी एका एजंटमार्फत आधारकार्ड आणि पॅनकार्ड बनवून घेतल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने बनावट कागदपत्रांच्या आधारे आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवून देणाऱ्या एजंटला देखील अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून एकूण १०९ बनावट पॅनकार्ड व ११ बनावट आधार कार्ड तसेच नगरसेवकाचा बनावट रबरी शिक्का जप्त करण्यात आला आहे.

कोपरखैरणे सेक्टर-१ मधील पार्वती प्रोव्हिजन जवळ दोन बागंलादेशी नागरिक बेकायदेशीरित्या वास्तव्य करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल आहेर व त्यांच्या पथकाने कोपरखैरणे सेक्टर-१ मधील पार्वती प्रोव्हिजन जवळ राहणाऱ्या दुल्लू प्रधान व फिरदोस शिकदार या बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी दोघांची चौकशी केली असता, त्यांनी बांग्लादेशी नागरिक असल्याचे कबूल केले. तसेच त्यांनी भारतीय असल्याचे भासविण्यासाठी आधारकार्ड व पॅनकार्ड आढळून आले. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एजंट गंगाप्रसाद तिवारी याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने नगरसेवकाचा बनावट रबरी शिका वापरून त्याआधारे रहिवासी दाखले बनवून दोन्ही बांग्लादेशी नागरिकांना पॅनकार्ड व आधारकार्ड बनवून दिल्याचे कबुल केले. यावेळी त्याच्याकडे वेगवेगळ्या नावाने तयार करण्यात आलेले बनावट पॅनकार्ड व आधार कार्ड तसेच नगरसेवकाचा रबरी शिक्का व सदरचा शिक्का वापरलेले कागदपत्रे आढळून आली.

अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दोन्ही बांग्लादेशी व एजंट या तिघांविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात फसवणुकीसह बनावटगीरी केल्याप्रकरणी तसेच भारतीय पासपोर्ट अधिनियम सह कलम १४ (अ), विदेशी नागरिक अधिनियमअन्वये गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून एकूण १०९ बनावट पॅनकार्ड व ११ बनावट आधार कार्ड व नगरसेवकाचा बनावट रबरी शिक्का जफ्त केला आहे. तसेच या गुह्यातील आरोपींचा सहकारी फैयाज फारार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in