नऊ महिन्यांत ४६५.७० कोटींची कर वसुली; मागील वर्षीच्या तुलनेत ६७.०५ कोटी अधिक कर जमा

सन २३-२४ वर्षांमध्ये अर्थसंकल्प सादर करताना मालमत्ता कर विभागास ८०० कोटी रकमेचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
नऊ महिन्यांत ४६५.७० कोटींची कर वसुली;  मागील वर्षीच्या तुलनेत ६७.०५ कोटी अधिक कर जमा

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत असून यामधूनच महानगरपालिकेस विविध सोयीसुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध होत असल्याने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी कर्मचारी समूहाने मालमत्ता कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

त्यादृष्टीने नियोजनबद्ध पावले टाकीत विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर विशेष लक्ष दिल्यानेच यावर्षी १ एप्रिल ते ३१ डिसेंबर या ९ महिन्यांच्या कालावधीत ४६५.७० कोटी मालमत्ता कर वसुली करण्यात विभागाने यश मिळवलेले आहे. मागील वर्षी ३१ डिसेंबरपर्यंत ३९८.६५ कोटी इतकी कर वसुली झाली असून यावर्षी त्यापेक्षा अधिक ६७.०५ कोटी रकमेची कर वसुली झाल्याने महानगरपालिकेच्या सेवा सुविधांकरिता अधिकचा निधी उपलब्ध झालेला आहे. त्या अनुषंगाने सन २३-२४ करिता अर्थसंकल्पात दिलेला ८०० कोटींचा लक्ष्यांक साध्य करणे, या उद्दिष्टपूर्तीकडे यशस्वीरीत्या सकारात्मक वाटचाल सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी मालमत्ताकर विभागातील अधिकारी-कर्मचारी वृंदाच्या वारंवार बैठका घेत थकबाकीदारांच्या रकमेची उतरत्या क्रमाने यादी तयार करून प्रत्येक विभाग कार्यालयास लक्ष्य ठरवून दिले व सातत्याने आढावा घेत याबाबतच्या कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले. त्यासोबतच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थकबाकीदारांच्या वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले तसेच मागील वर्षात करनिर्धारण झालेल्या मात्र मालमत्ता कर भरणा बाकी असलेल्या थकबाकीदारांच्या कर वसुलीकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले. त्याचप्रमाणे नवीन कर निर्धारण करण्यात आलेल्या मालमत्ता तसेच पहिल्या टप्प्यात औद्योगिक एमआयडीसी क्षेत्रात झालेल्या लीडार सर्वेक्षणाचा उपयोग काही प्रमाणात होऊन मालमत्ता कर वसुलीला गती लाभली. याचीच परिणिती म्हणून मागील वर्षीच्या तुलनेत डिसेंबर अखेरपर्यंत ६७ कोटी ५ लाख रुपयांचा अधिक मालमत्ता कर वसूल झालेली दिसून येत आहे.

नागरिकांना आवाहन

सन २३-२४ वर्षांमध्ये अर्थसंकल्प सादर करताना मालमत्ता कर विभागास ८०० कोटी रकमेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यादृष्टीने नियोजनबद्ध कार्यवाही करण्यात येत असून उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच महापालिका आयुक्त राजेश नार्वेकरांनी विहित वेळेत मालमत्ता कर भरणा करणाऱ्या तसेच थकबाकी भरणा करणाऱ्या नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. तसेच ज्या थकबाकीदारांनी अद्याप आपली थकबाकी व मालमत्ता कर भरणा केला नाही, त्यांनी तो करावा आणि आपल्यावर कारवाईची कटू वेळ येणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

३१ डिसेंबरपर्यंत विभागनिहाय मालमत्ता कर वसुली

बेलापूर विभाग

४६ कोटी ४३ लाख ४८ हजार ४१५

नेरूळ विभाग

९० कोटी ०१ लाख ६७ हजार ४३५

वाशी विभाग

३५ कोटी ७२ लाख ७० हजार ८००

तुर्भे विभाग

७८ कोटी ३९ लाख ८० हजार ५५६

कोपरखैरणे विभाग

८० कोटी ७० लाख २३हजार ८३५

घणसोली विभाग

४९ कोटी ८१ लाख ८२ हजार ९०

ऐरोली विभाग :

५७ कोटी ७१ लाख ७३ हजार ९७५

दिघा विभाग

१४ कोटी ५६ लाख ३५ हजार ८०६

मुख्यालय : १२ कोटी ३२ लाख १८ हजार २१९

एकूण ४६५ कोटी ७० लाख ०१ हजार १३१

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in