८०० कोटींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजनबद्ध कामाचे निर्देश; मालमत्ताकर वसुलीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अतिरिक्त आयुक्तांची आढावा बैठक

यावेळी त्यांनी थकबाकीदारांच्या रकमेची उतरत्या क्रमाने विभागवार यादी तयार करून प्रत्येक विभाग कार्यालयास लक्ष्य ठरवून देत याकडे बारकाईने नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले
८०० कोटींच्या उद्दिष्टपूर्तीसाठी नियोजनबद्ध कामाचे निर्देश; मालमत्ताकर वसुलीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी अतिरिक्त आयुक्तांची आढावा बैठक

नवी मुंबई : सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पामध्ये महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असणाऱ्या मालमत्ताकर वसुलीकडे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष लक्ष दिल्याने मागील वर्षीच्या जानेवारी महिन्यातील ४१७.१८ कोटी इतक्या रकमेच्या तुलनेत या आर्थिक वर्षात जानेवारी २०२४ पर्यंत १०० कोटी रुपये अधिक अशी ५२० कोटी रुपयांची वसूली झालेली आहे. यावर्षी ८०० कोटी रकमेचे मालमत्ताकर वसुली उद्दिष्ट ठेवण्यात आले असून अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या नियंत्रणाखाली मालमत्ताकर विभागाच्या अधिकारी, कर्मचारी समूहाने मालमत्ताकर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

याबाबत नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली यामध्ये अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी आपले उद्दिष्ट साध्य होण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने आपापल्या स्तरावर वसुलीचे नियोजन करावे आणि ते कालावधीची मर्यादा ठरवून ते साध्य करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असे स्पष्ट निर्देश दिले.

यावेळी त्यांनी थकबाकीदारांच्या रकमेची उतरत्या क्रमाने विभागवार यादी तयार करून प्रत्येक विभाग कार्यालयास लक्ष्य ठरवून देत याकडे बारकाईने नियमित लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले. नोटिसींना प्रतिसाद न देणाऱ्या थकबाकीदारांवर पुढील कायदेशीर कारवाई करत मालमत्ता जप्त करून आवश्यकतेनुसार त्यांचा लिलाव करण्याची कार्यवाही करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी अधिकाऱ्यांना दिले.

लिडार सर्वेक्षण पूर्ण झालेल्या मालमत्तांचे विभागामार्फत प्रत्यक्ष सर्वेक्षण करून मालमत्ताकराची डिमांड नोटीस देण्याबाबतही तत्पर कार्यवाही करण्याचे सूचित करण्यात आले. त्याचप्रमाणे भोगवटा प्रमाणपत्र प्रलंबित असलेल्या इमारती आणि एमआयडीसी क्षेत्र येथील मालमत्तांकडे प्राधान्याने लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना देण्यात आल्या. अशाच प्रकारे गावठाण विभागात बांधलेल्या इमारतीतील घरांना स्वतंत्र मालमत्ताकर देयके वितरीत करुन अधिकाधिक मालमत्ता या कराच्या कक्षेत येतील याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

विविध अंगाने मालमत्ताकराची थकबाकी वसुली करण्यासोबतच करनिर्धारण झालेल्या नवीन मालमत्ता या मालमत्ताकराच्या कक्षेत येण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी आणि या माध्यमातून मालमत्ताकराचे लक्ष्य साध्य करण्यावर भर द्यावा. ८०१ कोटी रुपये या वर्षींचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट आणि ९०० कोटी रुपये आगामी वर्षातील उद्दिष्ट साध्य करणे नियोजनबद्ध काम केल्यास अशक्य नाही. यामध्ये कोणत्याही अधिकारी, कर्मचारी यांची दिरंगाई आढळल्यास जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल.

-सुजाता ढोले, अतिरिवत आयुवत-नवी मुंबई महापालिका.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in