फ्लॅट कमी किमतीत मिळवून देण्याच्या बहाण्याने ८४ लाखांची फसवणूक

नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
फ्लॅट कमी किमतीत मिळवून देण्याच्या बहाण्याने ८४ लाखांची फसवणूक

नवी मुंबई : बँकेने सिल करून जप्त केलेले फ्लॅट कमी किमतीत मिळवून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने २८ व्यक्तींकडून सुमारे ८४ लाख रुपये उकळून आपले कार्यालय बंद करून पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. हार्दिक दिघे असे या भामट्याचे नाव असून नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

या प्रकरणातील भामट्या हार्दिक दिघेने जानेवारी २०२१ मध्ये वाशी रेल्वे स्थानकाजवळच्या रियल टेक पार्कमधील बाराव्या मजल्यावर एनपीए लिक्विडेटर या नावाने कार्यालय थाटले होते. त्यानंतर त्याने बँकेने सिल केलेले फ्लॅट विक्री करण्यासाठी त्याला नेमण्यात आल्याचे भासवून बँकेने सिल केलेले एनपीएमधील फ्लॅट कमी किमतीत मिळवून देण्याची जाहिरातबाजी सुरू केली होती.

या जाहिरातबाजीला भुलून नवी मुंबईसह मुंबई व ठाण्यातील अनेक गरजवंतांनी कमी किमतीत फ्लॅट मिळेल, या आशेने हार्दिक दिघेशी संपर्क साधला होता. त्यानंतर भामट्या हार्दिक दिघेने त्यांच्याकडून लाखो रुपये उकळून त्यांच्यासोबत एनपीए लिक्विडेटर्स कंपनीसोबत एमओयु करून देत त्यांचा विश्वास संपादन केला.

यातील अनेक ग्राहकांनी हार्दिक दिघेला पैसे देऊन दोन वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर देखील त्याने कुणालाही फ्लॅट दिला नाही. प्रत्येकवेळी तो वेगवेगळी कारणे सांगून टाळाटाळ करत होता. त्यामुळे काही ग्राहकांनी त्याच्याकडे पैसे परत करण्याचा तगादा लावला असता हार्दिकने वाशीतील कार्यालय बंद करून पळ काढला आहे. याप्रकरणी २८ ग्राहकांनी नवी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली आहे. त्याचबरोबर वाशी पोलीस ठाण्यात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in