पावसाच्या सरींसह नवी मुंबई शहराने पांघरली हिरवी शाल!

२४ तासात ९२.४८ मिलीमीटर पावसाची नोंद; नेरुळ, बेलापूर परिसरात सर्वाधिक पाऊस
पावसाच्या सरींसह नवी मुंबई शहराने पांघरली हिरवी शाल!

यंदाच्या वर्षी ओलांडलेल्या उष्णतेच्या पाऱ्याने नागरिक हैराण झाले होते. लहानांपासून सर्वचजण या उन्हाच्या दाहकतेतून सुटका करून घेण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत असतानाच पावसाने देखील नागरिकांना हुलकावणी दिली. मात्र मागील दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाने हजेरी लावत आपले बरसणे सुरू ठेवल्याने सर्वत्र आनंदी आनंद पाहायला मिळत आहे. अशातच नवी मुंबई शहरातही सुरु असलेल्या समाधानकारक पावसाने सर्वत्र आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे. पावसामुळे झाडे, रस्ते, उद्याने आणि एकूणच संपूर्ण शहराची मरगळ निघून गेली असून शहराने जणू हिरवी शाल पांघरल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत ठिकठिकाणी दिसून येत आहे.

राज्यातील विविध भागासह नवी मुंबई शहरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सलग २ दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने नवी मुंबई शहर ओलेचिंब झाले असून शहरातील तलाव, धरणे भरण्यास सुरुवात झाली आहे. अशातच मागील दोन-अडीच वर्षांपासून कोरोनाचे सावट, टाळेबंदी आणि वर्क फ्रॉम होम या परिस्थितीचा सामना करताना नवी मुंबईकरांची चांगलीच दमछाक होत होती. मात्र सर्वांना प्रिय असणाऱ्या पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीला काहीसा उसंत घेत १८ जूनपासून आपले बरसणे सुरु केले आहे. दरम्यान, १२५ हुन अधिक उद्याने, २५ तलाव, लांबसडक रस्ते आणि धरणाचा सामावेश असलेल्या नवी मुंबई शहरात यामुळे नवचैतन्य आले असून शहर न्हाऊन निघाले आहे. दरम्यान, सोमवार २० जून रोजी पावसाने आपले बरसणे सुरु ठेवत नवी मुंबईकरांचा आनंदात भर टाकली आहे. शहरात गेल्या २४ तासात जवळपास ९२.४८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून नेरुळ आणि बेलापूर परिसरात सर्वाधिकी पाऊस पडला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in