किरकोळ कारणावरून प्रवाशाला लोकलमधून ढकलले, एक हात निकामी

पनवेल रेल्वे पोलिसांनी अज्ञात चौकडीविरोधात मारहाणीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकणी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव राजेंद्रकुमार लालजी दिवाकर असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील कोसेबी जिह्यातील आहे.
किरकोळ कारणावरून प्रवाशाला लोकलमधून ढकलले, एक हात निकामी
(प्रातिनिधिक छायाचित्र)

नवी मुंबई : सीबीडी ते नेरूळदरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या एका ३२ वर्षीय प्रवाशाला लोकलमधील चौघा तरुणांनी बेदम मारहाण तसेच चाकूने हल्ला करून त्याला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत सदर प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर राजेंद्रकुमार या तरुणाचा एक हात निकामी झाला आहे.

पनवेल रेल्वे पोलिसांनी अज्ञात चौकडीविरोधात मारहाणीसह जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकणी गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या प्रवाशाचे नाव राजेंद्रकुमार लालजी दिवाकर असे असून तो मूळचा उत्तर प्रदेशमधील कोसेबी जिह्यातील आहे.

सात दिवसांपूर्वी तो आपल्या गावावरून ऐरोली येथे राहणाऱ्या भावाकडे लॉन्ड्रीच्या कामासाठी आला होता. शुक्रवारी राजेंद्रकुमार पनवेल येथे राहणाऱ्या नातेवाईकाला भेटून परतत असताना, पनवेल-सीएसएमटी लोकल पकडली. पण दरवाजावरील चार तरुणांशी त्याचा वाद झाला. चारही तरुणांनी राजेंद्रकुमारला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी एकाने चाकू काढून त्याच्या गालावर वार केले. त्यानंतर त्याच्या पाठीत चाकू खुपसून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर त्याला धावत्या लोकलमधून खाली ढकलून दिले.

लोकलमधील कुणीही प्रवाशी बचावासाठी पुढे आले नाहीत

या घटनेतील जखमी राजेंद्रकुमारला लोकलमध्ये चौघे तरुण बेदम मारहाण करत असताना, तसेच त्याच्यावर चाकूने वार करत असताना, सदर लोकलच्या डब्यामध्ये अनेक प्रवासी उपस्थित होते. यावेळी एकही प्रवासी राजेंद्रकुमारला वाचवण्यासाठी पुढे आला नाही. चौघा मारेकऱ्यांनी राजेंद्रकुमारला धावत्या लोकलमधून ढकलून दिले तरीही प्रवाशी घाबरून पुढे आले नाहीत.

logo
marathi.freepressjournal.in