१८ भूखंडांना प्रति चौ.मी. ६ लाख ४६ हजार रुपये दर ;५३ वर्षांच्या इतिहासात विक्रमी बोली

सिडकोच्या ५३ वर्षाच्या इतिहासातील हा सर्वाधिक विक्रमी दर प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे हाच भूखंड सिडकोने मार्च २०२३ मध्ये भूखंड विक्री योजना ३३ अंतर्गत विक्रीस काढला होता.
१८ भूखंडांना प्रति चौ.मी. ६ लाख ४६ हजार रुपये दर ;५३ वर्षांच्या इतिहासात  विक्रमी बोली

नवी मुंबई : सन २०२३ च्या वर्ष अखेरीस सिडकोने काढलेल्या भूखंड विक्री योजनेत १८ भूखंड विक्रीच्या माध्यमातून सिडकोच्या तिजोरीत तब्बल ११८० कोटी रुपयांची भर पडणार आहे, तर या भूखंड विक्री योजनेतील अन्य १८ भूखंडांना एकाही विकासकाने बोली न लावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भूखंड विक्री योजना ३६ अंतर्गत डिसेंबर २०२३ मध्ये सिडकोने नवी मुंबई क्षेत्रातील विविध नोडमधील ३६ भूखंड विक्रीस काढले होते. त्या भूखंड विक्री योजनेतील नेरूळ, सेक्टर ४ येथील भूखंड क्रमांक २३ ला प्रति चौरस मीटर ६ लाख ४६ हजार रुपये दर प्राप्त झाला आहे.

सिडकोच्या ५३ वर्षाच्या इतिहासातील हा सर्वाधिक विक्रमी दर प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे हाच भूखंड सिडकोने मार्च २०२३ मध्ये भूखंड विक्री योजना ३३ अंतर्गत विक्रीस काढला होता. त्यावेळेस या भूखंडाला प्रति चौरस मीटर ६ लाख ७२ हजार रुपये दर प्राप्त झाला होता. परंतु सदर दर भरणाऱ्या विकासकाने भूखंडाची रक्कम विहित वेळेत सिडकोकडे न भरल्याने सिडकोने संबंधित विकासकाची इसारा अनामत रक्कम (ईएमडी) जप्त करून सदर भूखंड पुन्हा विक्रीस काढल्याची माहिती सिडको सूत्रांनी दिली. त्यानुसार या भूखंडाला ६ लाख ४६ हजार रुपये प्रति चौरस मीटरचा दर प्राप्त झाला आहे.

वर्षभरापूर्वी सदर भूखंड सिडकोने ताब्यात घेऊन तो सर्वप्रथम मार्च २०२३ मध्ये निविदेद्वारे विक्रीस काढला होता. जवळपास २५०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या भूखंडाच्या आताच्या योजनेअंतर्गत झालेल्या विक्रीतून सिडकोला १५९ कोटी ७ लाख रुपये प्राप्त होणार आहेत. सदर भूखंडाला फाल्कोन इलेक्ट्रो टेक प्रा. लि. या कंपनीने सर्वाधिक बोली लावली आहे. गत सहा महिन्यांपासून सिडकोच्या ऐरोली, घणसोली, वाशी, नेरूळ, बेलापूर, खारघरमधील काही मोक्याच्या भूखंडांना जास्त रकमेची बोली प्राप्त झाली होती. या ३६ व्या भूखंड विक्री योजनेअंतर्गत सिडको महामंडळाला विविध ठिकाणच्या १८ भूखंड विक्रीसाठी विकासकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला आहे.

दळणवळण व पायाभूत सुविधांमुळे मागणी

सिडकोच्या भूखंडांना मागणी दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबई शहराची उभारणी करताना सिडकोने निर्माण केलेल्या पायाभूत सुविधा व रेल्वे-विमानतळ-मेट्रोसारख्या दळणवळणाच्या प्रकल्पांमुळे नवी मुंबईकडे नागरिक आकर्षित होत आहेत. त्यामुळेच सिडको भूखंडांना देखील तेवढीच मागणी वाढत असल्याचे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी म्हटले आहे.

वाशीतील भूखंडांना पसंती नाही

सिडकोने, वाशी सेक्टर १९ए येथील विक्रीस काढलेल्या तिन्ही भूखंडांना विकासकांनी प्रतिसाद न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. घणसोली येथील एका ६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत १९२ कोटी, तर नेरूळ येथील एका सात हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरी २५३ कोटी व नवीन पनवेल येथील एका सात हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंड विक्रीतून सिडकोच्या तिजोरीत १२८ कोटी रुपये जमा होणार आहेत.

अतिक्रमणमधील भूखंड ताब्यात घेण्याची मागणी

नवी मुंबईतील काही भूमाफिया व राजकीय पदाधिकारी सिडकोच्या शेकडो भूखंडांवर अतिक्रमण करून ते भूखंड हडप केले आहेत. राजकीय वरदहस्तामुळे राजकारण्यांनी अतिक्रमण केलेले भूखंड ताब्यात घेण्यास सिडकोचे अधिकारी देखील धजावत नसल्याने या भूमाफिया व राजकीय पदाधिकाऱ्यांचे चांगलेच फावले आहे. त्यामुळे या भूमाफिया व राजकीय पदाधिकाऱ्यांवर सिडकोने फौजदारी कारवाई करून त्यांनी हडप केलेले भूखंड ताब्यात घेण्याची मागणी जोर धरत आहे.

logo
marathi.freepressjournal.in