वेलची चोरल्याच्या आरोपावरून कामगाराला मारहाण; दुकान मालकासह सहा जणांना अटक

या मारहाणीत जखमी झालेल्या कामगाराचे नाव राकेश पटेल (३०) असे असून तो मागील दोन महिन्यांपासून एपीएमसी मसाला मार्केटमधील रौनक भानुशाली यांच्या स्वस्तिक ट्रेडर्स या मसाला व ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये काम करत होता.
वेलची चोरल्याच्या आरोपावरून कामगाराला मारहाण; दुकान मालकासह सहा जणांना अटक

नवी मुंबई : एपीएमसी मसाला मार्केटमधील स्वस्तिक ट्रेडर्सच्या दुकान मालकाने व त्यांच्याकडे कामाला असलेल्या कर्मचाऱ्यांनी ५० किलो वेलची चोरल्याच्या आरोपावरून त्यांच्या दुकानात कामाला असलेल्या एका कामगाराला मारहाण केली. याप्रकरणी कामगाराला अमानुष वागणूक देणाऱ्या सहा जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करून सर्वांना अटक केली आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्या कामगाराचे नाव राकेश पटेल (३०) असे असून तो मागील दोन महिन्यांपासून एपीएमसी मसाला मार्केटमधील रौनक भानुशाली यांच्या स्वस्तिक ट्रेडर्स या मसाला व ड्रायफ्रूटच्या दुकानामध्ये काम करत होता. गत २६ मार्च रोजी राकेश पटेल याने दुकानातून ५० किलो वेलची चोरल्याचा मालक रौनक पटेल याला संशय आला होता. रौनक भानुशाली हा पहाटे अडीच वाजेपर्यंत राकेशला कॉल करत होता. दुसऱ्या दिवशी राकेश नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर सायंकाळी दुकानमालक रौनक भानुशाली याने राकेशकडे दुकानातून चोरीला गेलेल्या वेलचीबाबत विचारणा केली.

मात्र राकेशने वेलची चोरी केले नसल्याचे सांगितल्यानंतर सदर दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मालक रौनक भानुशाली याच्या सांगण्यानुसार राकेशला दुकानाच्या टेरेसवर नेले. त्यानंतर भानुशाली याने राकेशला कपडे काढण्यास सांगून त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा रौनक भानुशाली व करण या दोघांनी मोबाईलमध्ये व्हिडीओ चित्रण सुद्धा केले असून त्या व्हिडीओमध्ये राकेशवर दबाव आणून जबरदस्तीने त्याला इलायची चोरल्याचे कबूल करण्यास रौनक भानुशाली याने भाग पाडले. त्यानंतर रौनक भानुशाली याने राकेशने चोरी केल्याचे कबूल केल्यामुळे त्याला पायातील बूट चाटायला लावले. अशा पद्धतीने राकेशला अमानुष व क्रूर वागणूक दिल्यानंतर रौनक भानुशाली व त्याच्या सहकाऱ्यांनी राकेशला जखमी अवस्थेत एपीएमसी पोलिसांच्या ताब्यात दिले.

स्वस्तिक ट्रेडर्स या दुकानात काम करणाऱ्या कामगाराला वेलची चोरल्याच्या आरोपावरून मारहाण करून त्याला अमानुष वागणूक देण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुकान मालकासह सहा जणांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या सर्वांची तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.

- अजय शिंदे, (वरिष्ठ पोलीस निरीक्षक एपीएमसी पोलीस ठाणे)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in