नवी मुंबई : दहा वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पनवेल येथील विशेष सत्र न्यायाधीश शाहिदा शेख यांनी जन्मठेप व १ लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. शैलेंद्र लक्ष्मण सहानी (२२) असे या नराधमाचे नाव असून मार्च २०१६ मध्ये त्याने आपल्या शेजारी राहणाऱ्या १० वर्षीय मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. सदर खटल्याच्या निकालाकडे पनवेल आणि तळोजा परिसरातील लोकांचे लक्ष लागून राहिले होते.
या घटनेतील नराधम आरोपी शैलेंद्र सहानी हा २०१६ मध्ये तळोजा भागात राहण्यास होता. त्यावेळी त्याने आपल्या शेजरी राहणाऱ्या १० वर्षीय पीडित मुलीला झांशी येथे पळवून नेले होते. त्यावेळी पीडित मुलीच्या आईने आरोपीविरुद्ध तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा व पीडित मुलीचा शोध घेतला असता, आरोपी हा पीडित मुलीसोबत झांशी रेल्वे स्टेशन येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला झाशी येथून पकडून आणले होते. त्यावेळी पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदविला असता आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याचे निष्पन्न झाले होते.
त्यानंतर पोलिसांनी आरोपी शैलेंद्र सहानी याच्या विरोधात अपहरणासह बलात्कार व पोक्सो कलमानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. त्यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेष काळसेकर यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पनवेल येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सरकारपक्षातर्फे एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडिता, पीडितेची आई हिची साक्ष तसेच डॉ. जया श्रीनिवासन व तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हरेष काळसेकर यांची साक्ष महत्वाची ठरली.
सदर खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील प्रतिक्षा वडे वारंगे यांनी न्यायालयासमोर केलेला युक्तिवाद तसेच उपलब्ध साक्षी पुरावे ग्राह्य धरून पनवेल येथील विशेष सत्र न्यायाधीश शाहिदा शेख यांनी आरोपी शैलेंद्र लक्ष्मण सहानी याला दोषी ठरविले होते.