बारीवीच्या परीक्षेसाठी घरातून बाहेर पडला, केंद्रावर पोहोचलाच नाही; विद्यार्थ्याचा पोलिसांकडून शोध सुरू

बारावीच्या परीक्षेला जाण्यासाठी घणसोली येथून बुधवारी सकाळी घराबाहेर पडलेला १७ वर्षीय विद्यार्थी परीक्षा केंद्रावरही पोहोचला नाही
बारीवीच्या परीक्षेसाठी घरातून बाहेर पडला, केंद्रावर पोहोचलाच नाही;  विद्यार्थ्याचा पोलिसांकडून शोध सुरू
(संग्रहित छायाचित्र)

नवी मुंबई : बारावीच्या परीक्षेला जाण्यासाठी घणसोली येथून बुधवारी सकाळी घराबाहेर पडलेला १७ वर्षीय विद्यार्थी परीक्षा केंद्रावरही पोहोचला नाही, तसेच तो आपल्या घरी देखील परतला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. परीक्षेच्या भितीने हा विद्यार्थी बेपत्ता झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. रबाळे पोलीस ठाण्यात या विद्यार्थ्याच्या मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत आहे.

या घटनेतील बेपत्ता विद्यार्थी घणसोली सेक्टर-७ मधील सिम्पलेक्स वसाहतीत राहण्यास असून तो इयत्ता बारावीत आहे. बुधवारपासून बारावीची परीक्षा सुरू झाली असून या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र सेंट मेरी स्कूलमध्ये आले होते. त्यामुळे बुधवारी सकाळी पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास हा विद्यार्थी परीक्षेला जात असल्याचे सांगून आपल्या घरातून निघून गेला. मात्र तो वाशी येथील परीक्षा केंद्रावर न जाता कुठेतरी निघून गेला. परीक्षा संपल्यानंतर हा विद्यार्थी सायंकाळी घरी न परतल्याने पालकांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता, तो बंद असल्याचे आढळून आले.

त्यांनतर पालकांनी परीक्षा केंद्रावर माहिती घेतली असता, तो परीक्षा केंद्रावर आलाच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यानंतर या विद्यार्थ्याच्या पालकांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली, मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर त्यांनी रबाळे पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांकडून बेपत्ता झालेल्या या विद्यार्थ्याचा शोध घेण्यात येत आहे. या विद्यार्थ्याला परीक्षेला बसायचे नव्हते, त्यामुळे तो कुठेतरी निघून गेला असावा अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in