
कर्नाळा : कर्नाळा किल्यावर शनिवारी सकाळी पर्यटनासाठी आलेल्या व्यक्तीला प्राण गमावण्याची वेळ आली आहे. मृत व्यक्तीचे नाव संदीप गोपाळ पुरोहित असे आहे. मधमाश्यांनी केलेल्या हल्यामुळे पर्यटकांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. यामध्ये सर्वच पर्यटकांनी पळापळ करण्यास सुरुवात केल्याने संदीप यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मधमाश्यांच्या हल्ल्यात अजून पाचजण जखमी असून त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शनिवारी सकाळी सुट्टी असल्याने शेकडो पर्यटक कर्नाळा किल्यावर आले होते. यामध्ये मुंबई येथील व्हीजेटीआय महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांचा मोठा समूह होता. त्याचसोबत काही पालक आपल्या मुलांना कर्नाळा किल्यावर पर्यटनासाठी घेऊन आले होते. ४० ते ५० पर्यटकांचा गोंधळ झाल्यामुळे मधमाशा भडकल्याने त्यांनी अनेकांना दंश केले. या घटनेची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांना समजल्यावर त्यांनी तातडीने पोलीस उपनिरीक्षक विष्णू टोने यांच्यासह तेथे पोलीस पथक रवाना केले. या दरम्यान जखमींनी रुग्णवाहिकेसाठी १०८ वर संपर्क साधल्याने जखमींना वेळीच मदत मिळाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
जखमींना पनवेल येथील नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ४४ वर्षीय संदीप हे नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे राहतात. शनिवारी ते कुटुंबासोबत येथे आले होते. संदीप यांच्या डोळ्याला मधमाश्यांनी दंश केल्यानंतर सैरावैरा धावणारे संदीप याच गोंधळात पडले. त्याचवेळी दगड डोक्याला लागून रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने त्यांना उपचार मिळण्यापूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.