नवी मुंबईतील मनसैनिकाचा 'राजगर्जना' देखाव्याद्वारे राज ठाकरेंना अनोखा नमस्कार!

अक्षय कदमने घरगुती गणरायासाठी साकारला सभेचा देखावा; राज ठाकरे यांचे विचार घरोघरी पोहचवण्यासाठी वेगळा प्रयत्न
नवी मुंबईतील मनसैनिकाचा 'राजगर्जना' देखाव्याद्वारे राज ठाकरेंना अनोखा नमस्कार!

लाडक्या गणरायासाठी राज्यभरातील मंडळात, घरगुती गणपतीसाठी विविध देखावे साकारण्यात आले आहेत. कुठे महल, कुठे मंदिर, कुठे सामाजिक संदेश देणारे देखावे तर कुठे टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचा वापर करत देखावे साकारण्यात आले आहेत. मात्र नवी मुंबईतील अक्षय कदम या तरूणाने आदर्श मानणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भव्य दिव्य सभेचा 'राजगर्जनेचा' देखावा साकारत आपल्या नेत्याला अनोखा नमस्कार केला आहे.

राज ठाकरे यांचे विचार घरोघरी पोहचावेत यासाठी हा देखावा अक्षय कदम यांच्याकडून साकारण्यात आला असून त्याच्या या देखाव्याची सध्या नवी मुंबई शहरात जोरदार चर्चा सुरु आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे म्हंटल की तुफान गर्दी, विरोधकांवर जोरदार टोलेबाजी आणि सर्वसामान्यांना विचार करायला लावेल असे वक्तृत्त्व. दुकानांवरील मराठी पाट्या असो किंवा टोलबंद आंदोलन असो. अलीकडेच हाती घेण्यात आलेला मशिदींवरील भोंग्यांचा विषय असो. कायम आपल्या आक्रमक आणि अभ्यासू शैलीतून विरोधकांना धारेवर धरत महाराष्ट्र घडवण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची धडपड सुरु आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होत अनेक तरुणतरुणी पुढे सरसावले आहेत. ठाकरे यांचे हे विचार घरोघरी पोहचता यावे यासाठी वेगवेगळे उपक्रम सुरु असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यात आणखी भर पडली आहे. नवी मुंबईतील नेरुळचा रहिवासी असलेल्या अक्षय कदम या मनसैनिकाने आपल्या घरच्या बाप्पाभोवती चक्क मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भव्य दिव्य सभेचा देखावा उभारला आहे. 'राजगर्जना' या संकल्पनेवर आधारित या देखाव्यात राज ठाकरे सभेला मार्गदर्शन करतानाच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या असून राज ठाकरे यांची गाजलेली अनेक भाषणे या देखाव्यावेळी ऑडिओ क्लिपद्वारे येणाऱ्या भक्तांना ऐकवण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करत अक्षय कदम यांच्यासोबत प्रियेश सावंत, मंगेश चौगुले, अनिकेत गोळे आदी सहकाऱ्यानी मिळून देखावा साकारला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in