नवी मुंबई : वाशीतील जुहू गावात राहणाऱ्या एका १५ वर्षीय मुलाने धावत्या लोकलमधून वाशी खाडीमध्ये उडी टाकून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अरुण अजित सिंह असे या मुलाचे नाव असून मंगळवारी सायंकाळी तो आपल्या घरातून निघून गेला होता. त्यानंतर बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह वाशी खाडीत सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या मुलाच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
या घटनेतील मृत अरुण सिंह हा मुलगा वाशीतील जुहूगावात आई वडील व भावंडांसह राहत होता. तसेच तो वाशीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता नववीत शिकत होता. मंगळवारी त्याचे आई-वडील कामावर गेले असताना, सायंकाळी अरुण हा आपल्या घरातून बाहेर पडला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने आई-वडिलांनी त्याचा सर्वत्र शोध घेऊन वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार वाशी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून बेपत्ता झालेल्या अरुणचा शोध सुरू केला होता. त्यासाठी वाशी पोलिसांनी वाशी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, अरुण हा रात्री वाशी रेल्वे स्थानकातून लोकलने मानखुर्द येथे गेल्याचे निदर्शनास आले.
त्यानंतर तो मानखुर्द रेल्वे स्थानकात उतरून पुन्हा वाशीच्या दिशेने येत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये निदर्शनास आले. मात्र तो वाशीत उतरताना निदर्शनास आला नव्हता. यादरम्यान, अरुण ज्या लोकलने मानखुर्द येथून वाशी येथे परतत होता, सदर लोकल वाशी खाडीपुलावर आल्यानंतर अरुणने धावत्या लोकलमधून वाशी खाडीमध्ये उडी मारून आत्महत्या केली होती. याबाबतची माहिती काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना दिली होती. त्यानुसार वाशी पोलिसांकडून बेपत्ता अरुणचा शोध घेण्यात येत असताना, बुधवारी सायंकाळी अरुणचा मृतदेह वाशी खाडीमध्ये तरंगताना निदर्शनास आला. त्यानंतर वाशी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने अरुणचा मृतदेह बाहेर काढला. अरुणने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलीस उपनिरीक्षक निलेश बारसे यांनी सांगितले.
वाशीत आठवडाभरात
तीन आत्महत्या
वाशीतील जुहू गावात राहणाऱ्या तिघांनी या आठवडाभरात आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. २२ डिसेंबरला कमल विलास बेंडे या ५८ वर्षीय महिलेने मणक्याच्या आजारपणामुळे कंटाळून राहत्या इमारतीच्या टेरेसवरून खाली उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर २६ डिसेंबरला शिल्पा रमेश एकावडे (२०) या विवाहितेने अज्ञात कारणावरून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आता अरुण सिंह या मुलाने वाशी खाडीत उडी टाकून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.