एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कारला अपघात; १ तरुण ठार, तर इतर ५ जण जखमी

एकविरा देवीचे दर्शन घेऊन पनवेल येथे परतणाऱ्या तरुणांच्या कारला पनवेलजवळ अपघात झाल्याने कारचालक तरुणाचा मृत्यू, तर इतर पाच तरुण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी जुन्या मुंबई-पुणे मार्गावर बारवई गाव येथे घडली.
एकविरा देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या कारला अपघात; १ तरुण ठार, तर इतर ५ जण जखमी
प्रातिनिधिक फोटो
Published on

नवी मुंबई : एकविरा देवीचे दर्शन घेऊन पनवेल येथे परतणाऱ्या तरुणांच्या कारला पनवेलजवळ अपघात झाल्याने कारचालक तरुणाचा मृत्यू, तर इतर पाच तरुण जखमी झाल्याची घटना सोमवारी सकाळी जुन्या मुंबई-पुणे मार्गावर बारवई गाव येथे घडली. या अपघातात मृत कारचालकाने भरधाव वेगात कार चालवून नेल्यामुळे कारवरील त्याचे नियंत्रण सुटून सदरचा अपघात झाल्याचे आढळून आले आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी मृत कारचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

या अपघातातील मृत अजय गीरे (२३) व गंभीर जखमी गजानन देवकर (२२) व किरकोळ जखमी ज्ञानेश्वर माळी (२३), निलेश मुंजळकर (१९), गोपाळ माळी (१९) व सुभाष माळी (२४) हे सर्वजण एकमेकांचे नातेवाईक असून सर्वजण ओवळे गावात राहण्यास आहेत. गत रविवारी २१जुलै रोजी हे सर्वजण गजानन देवकर याची इर्टिगा कार घेऊन एकविरा देवीच्या दर्शनासाठी गेले होते.

एकविरा देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते सर्वजण सायंकाळी तळेगाव येथे राहणाऱ्या आकाश गुंजकर या मित्राच्या घरी गेले होते. त्यानंतर ते सोमवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास पनवेल येथे कारने निघाले होते. तळेगावपासून गोपाळ माळी गाडी चालवत होता. लोणावळा येथे त्यांनी चहा घेतल्यानंतर अजय गिरे याने गाडी चालवण्यास घेतली. अजयसोबत पुढील सीटवर गजानन देवकर बसला होता. तर पाठीमागे इतर चौघे बसले होते. सकाळी ६वाजण्याच्या सुमारास त्यांची कार जुन्या मुंबई-पुणे मार्गावरील बारवई गावाच्या हद्दीत आली असताना अजय गिरे याचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे त्यांची कार रस्त्याच्या बाजूला खाली जाऊन जोरात पलटी झाली. या अपघातात कारचालक अजय गिरे व त्याच्या बाजूला बसलेला गजानन देवकर हे दोघेही गंभीर जखमी झाले. तर पाठीमागे बसलेले चौघे किरकोळे जखमी झाले. अपघातातील सर्व जखमींना पनवेल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्याठिकाणी अजय गिरे याचामृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

logo
marathi.freepressjournal.in