वर्षभरात ७१ हजार ४५० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई; १ कोटी १६ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल

तळोजा वाहतूक शाखेच्या हद्दीमध्ये सन २०२२ मध्ये १७ प्राणांतिक अपघाताच्या घटना घडल्या होत्या.
वर्षभरात ७१ हजार ४५० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई; १ कोटी १६ लाख १७ हजार रुपयांचा दंड वसूल
ANI

नवी मुंबई : तळोजा वाहतूक शाखेने २०२३ या वर्षामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ७१ हजार ४५० वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल १ कोटी १६ लाख १७ हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. तळोजा वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांमध्ये केलेल्या जनजागृती व दंडात्मक कारवाईमुळे या वर्षामध्ये प्राणांतिक अपघाताच्या घटनेत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे.

वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे यासाठी तळोजा पोलिसांकडून वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांमध्ये नियमित जनजागृती करण्यात येते. त्याचबरोबर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई देखील करण्यात येते. तळोजा वाहतूक शाखेने आपल्या हद्दीत २०२३ या वर्षामध्ये आपल्या हद्दीत ठिकठिकाणी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ७१ हजार ४५० वाहनचालकावर कारवाई केली आहे. यात ९९ केसेस या ड्रंक ॲन्ड ड्राईव्हच्या आहेत. या सर्वांकडून तब्बल १ कोटी १६ लाख १७ हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे. यात नो पार्किंग, विदाऊट हेल्मेट, विदाऊट सीट बेल्ट, मोबाईल टॉकिंग, सिग्नल ब्रेकिंग, रिक्षाचालकांवर कारवाई आदी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांचा समावेश आहे. यापुढील काळात देखील नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून वाहने चालवावीत, असे आवाहन तळोजा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल कदम यांनी केले आहे.

प्राणांतिक अपघाताच्या घटनेत घट

दरम्यान, तळोजा वाहतूक शाखेच्या हद्दीमध्ये सन २०२२ मध्ये १७ प्राणांतिक अपघाताच्या घटना घडल्या होत्या. तर सन २०२३ मध्ये ११ प्राणांतिक अपघाताच्या घटना घडल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. तळोजा वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांमध्ये केलेली जनजागृती व दंडात्मक कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये काही प्रमाणात शिस्त लागल्याने या वर्षामध्ये प्राणांतिक अपघाताच्या घटनेत घट झाल्याचे दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in