

नवी दिल्ली : अदानी एंटरप्रायझेस लिमिटेडने (एईएल) विमानतळ शहर विस्तार धोरणाचा भाग म्हणून हॉटेल आणि रिअल इस्टेट विकासावर लक्ष केंद्रित करणाऱ्या तीन नवीन उपकंपन्या स्थापन केल्या आहेत. 'अदानी एअरपोर्ट सिटी लिमिटेड' या उपकंपनीने 'अदानी नवी मुंबई एअरपोर्ट सिटी लिमिटेड', 'अदानी गुवाहाटी एअरपोर्ट सिटी लिमिटेड' आणि 'अदानी अहमदाबाद एअरपोर्ट सिटी लिमिटेड' या कंपन्यांची स्थापना केली आहे.
या नवीन कंपन्या स्वतःच्या किंवा भाड्याने घेतलेल्या मालमत्तेवर रिअल इस्टेट उपक्रम, इमारतींचे बांधकाम, एकात्मिक रेस्टॉरंट्स, बँक्वेट्स, बिझनेस सेंटर्ससह हॉटेल्स चालवण्याचे काम करतील. प्रत्येक उपकंपनीची स्थापना १० लाख रुपयांच्या भरणा केलेल्या भांडवलासह करण्यात आली असून, त्यांचे संपूर्ण मालकी हक्क 'अदानी एअरपोर्ट सिटी लिमिटेड'कडे आहेत. या उपकंपन्यांच्या माध्यमातून अदानी समूह विमानतळ परिसरात मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा निर्माण करणार आहे.
अदानी एअरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेडची स्थापना २०१९ मध्ये 'एईएल'ची उपकंपनी म्हणून करण्यात आली होती. आज ही देशातील सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी असून, त्यांच्याकडे अहमदाबाद, लखनौ, मंगळुरू, जयपूर, गुवाहाटी आणि तिरुवनंतपुरम येथील विमानतळांचे व्यवस्थापन आहे. याशिवाय, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडमध्ये ७३ टक्के हिस्सा आहे.