विमान भाडे झाले दुप्पट; हापूसच्या निर्यातीतही गळ होण्याचा धोका

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बाराशे किलो हापूस आंब्याच्या पेट्या गुरुवारी अमेरिकेला रवाना झाल्या. यंदाच्या हंगामातील ही पहिली निर्यात आहे.
विमान भाडे झाले दुप्पट; हापूसच्या निर्यातीतही गळ होण्याचा धोका
विमान भाडे झाले दुप्पट; हापूसच्या निर्यातीतही गळ होण्याचा धोका'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मुंबई : वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून बाराशे किलो हापूस आंब्याच्या पेट्या गुरुवारी अमेरिकेला रवाना झाल्या. यंदाच्या हंगामातील ही पहिली निर्यात आहे. मात्र विमान मालवाहतुकीचे जवळपास दुपटीने वाढलेले असल्याने निर्यातदारांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

सर्वच स्तरांवरील वाढते खर्च आणि आखाती युद्धाचे सावट यामुळे यंदाच्या हंगामाची सुरुवात मात्र धीम्या गतीने झाली. युद्धामुळे विमान सेवा विस्कळीत आहेत. त्यातच विमान मालवाहतुकीचे दर प्रति किलो ३५० रुपयांवरून थेट ६०० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. यामुळे नफ्यावर परिणाम होऊन जागतिक बाजारपेठेत टिकून राहणे कठीण झाले आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

“हापूसचा हंगाम सुरू होताच विमान कंपन्यांनी मालवाहतूक दरात मोठी वाढ केली आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे विमान भाड्यात वाढ झाली असून, त्याचा थेट फटका निर्यातीला बसत आहे,” असे प्रकाश खक्कर यांनी सांगितले.

या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी खाक्कर यांनी केंद्र सरकारला हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. तसेच, महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांना पत्र लिहून विमान मालवाहतूक शुल्कात सवलत देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून हापूससारख्या प्रीमियम उत्पादनाची निर्यात टिकवता येईल.

"अडचणी असूनही, आम्ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. परंतु, हा व्यापार टिकवून ठेवण्यासाठी सरकारकडून मालवाहतूक शुल्कात सवलत मिळणे अत्यंत आवश्यक आहे," असे खाक्कर यांनी नमूद केले.

यंदा किती निर्यात?

गेल्या वर्षी आखाती देशांमध्ये सुमारे २,००० टन हापूसची निर्यात झाली होती, ज्यामध्ये एकट्या ‘के.बी. एक्सपोर्ट’चा १,२०० टनांचा वाटा होता. मात्र, यावर्षी वाढता खर्च आणि अस्थिर जागतिक परिस्थितीमुळे निर्यातीत घट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

विमान कंपन्या मनमानी पद्धतीने दर वाढवत आहेत. यामुळे निर्यातदारांवर मोठा आर्थिक ताण येत आहे. व्यापार टिकवून ठेवण्यासाठी सरकारकडून मालवाहतूक शुल्कात सवलत मिळणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रकाश खक्कर, निर्यातदार

logo
marathi.freepressjournal.in