Navi Mumbai : लोकलच्या धडकेत दोन मित्रांचा मृत्यू

रेल्वे रुळालगत भांडण करत असलेल्या तीन मित्रांपैकी दोघांनी रेल्वे रुळ ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता दोघांना लोकलने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ऐरोली व दिघा रेल्वे स्थानकादरम्यान घडली.
Navi Mumbai : लोकलच्या धडकेत दोन मित्रांचा मृत्यू
Published on

नवी मुंबई : रेल्वे रुळालगत भांडण करत असलेल्या तीन मित्रांपैकी दोघांनी रेल्वे रुळ ओलांडून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता दोघांना लोकलने धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ऐरोली व दिघा रेल्वे स्थानकादरम्यान घडली. या अपघातप्रकरणी ठाणे रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

या अपघातातील मृत तरुणांमध्ये सागर संजीव सोनवणे (२२) व सचिन छबुराव रोकडे (२४) या दोघांचा समावेश असून हे दोघेही ऐरोली नाका परिसरात राहत होते. रविवारच्या सुमारास सागर आणि सचिन व त्यांचा तिसरा साथीदार नरेश बाबुराव सोनवणे (२७) हे तिघेही ऐरोली व दिघा गाव या रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाजवळ एकमेकांसोबत भांडण करत होते. या भांडणादरम्यान नरेश दोघांना मारण्यासाठी त्यांच्या मागे धावला असता, सागर आणि सचिन ता दोघांनी त्याच्यापासून दूर पळून जाण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून जाण्याचा प्रयत्न केला. याचवेळी ठाण्याच्या दिशेने जाणारी लोकल आल्याने सदर लोकलची सागर आणि सचिन या दोघांना धडक लागली.

त्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाल्याने दोघांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर लोकल काहीवेळ खोळंबली होती. या अपघाताप्रकरणी ठाणे रेलवे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्चना दुसाणे यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in