११ महिन्यांनंतर ऐरोलीतील थरारक मर्डर मिस्ट्री उघड; अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकरासह पत्नीने केला निर्घृण खून

अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचे व त्यानंतर मृतदेहाचे मुंडके, धड आणि पाय असे तीन तुकडे करून ते गवळी देव परिसरातील घनदाट जंगलात फेकून पुरावे नष्ट केल्याचे उघडकीस आले आहे.
११ महिन्यांनंतर ऐरोलीतील थरारक मर्डर मिस्ट्री उघड; अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकरासह पत्नीने केला निर्घृण खून
११ महिन्यांनंतर ऐरोलीतील थरारक मर्डर मिस्ट्री उघड; अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा प्रियकरासह पत्नीने केला निर्घृण खून 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

नवी मुंबई : ऐरोलीतील यादवनगर परिसरात ११ महिन्यांपूर्वी घडलेल्या एका अंगावर काटा आणणाऱ्या हत्याकांडाचा अखेर रबाळे एमआयडीसी पोलिसांनी छडा लावला आहे. अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याचे व त्यानंतर मृतदेहाचे मुंडके, धड आणि पाय असे तीन तुकडे करून ते गवळी देव परिसरातील घनदाट जंगलात फेकून पुरावे नष्ट केल्याचे उघडकीस आले आहे.

या हत्या प्रकरणात पोलिसांनी मृत बलीराम सूर्यनाथ कुशवाह (५०) याची पत्नी सुनिता कुशवाह (४०) आणि तिचा प्रियकर राहुल दशरथ प्रजापती (३०) या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने दोघांनाही सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, पोलिसांनी बलीरामच्या मृतदेहाचे अवशेष शोधण्यासाठी गवळी देव डोंगर परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.

या घटनेत हत्या झालेले बलीराम कुशवाह हे यादव नगरमध्ये पत्नी व दोन मुलांसह राहत होते. दरम्यान, सुनिता हिचे घणसोली येथे राहणारा रिक्षाचालक राहुल प्रजापती याच्याशी अनैतिक संबंध जुळले होते. या संबंधांची माहिती बलीराम यांना मिळाल्यानंतर त्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे पतीला कायमचा मार्गातून दूर करण्याचा कट सुनिता आणि राहुल यांनी रचला होता. हा कट यशस्वी करण्यासाठी सुनिताने दोन्ही मुलांना मावशीकडे पाठवले.

त्यानंतर ९ ऑगस्ट २०२५ च्या रात्री बलीराम झोपेत असताना सुनिता आणि राहुल यांनी प्रथम गळा आवळला. त्यानंतर धारदार चाकूने गळ्यावर वार करून त्यांची हत्या केली. हत्येचे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी घरातच बलीरामच्या मृतदेहाचे मुंडके, धड आणि पाय असे तीन तुकडे केले. ते वेगवेगळ्या गोण्या आणि चादरीत गुंडाळून राहुलच्या रिक्षातून रात्रीच्या अंधारात गवळी देव परिसरातील दाट झाडीमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिले.

हत्येनंतर सुनिताने यादव नगरमधील घर भाड्याने देऊन मुलांसह राहुलसोबत घणसोली येथे वास्तव्यास सुरुवात केली. आठ महिन्यांनंतर बलीरामचा भाऊ गावाहून आल्यानंतर त्याने भावाबाबत चौकशी केली असता, सुनिताने भांडण करून घर सोडून गेला असे सांगून वेळ मारून नेली. मात्र संशय वाढल्याने त्याने एप्रिल २०२६ मध्ये रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलीराम बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यानंतर सुनिता आणि राहुल यांनी जुने मोबाईल व सिमकार्ड बदलून नवे हँडसेट वापरण्यास सुरुवात केली. मात्र तांत्रिक तपासादरम्यान राहुलचे वेगवेगळ्या क्रमांकांवरून केवळ सुनिताशीच सातत्याने संपर्क असल्याचे ‘सीडीआर’मधून समोर आले. याशिवाय सुनिता प्रत्येक चौकशीत पतीबाबत वेगवेगळी माहिती देत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. अखेर पोलिसांनी दोघांना गुप्तपणे ताब्यात घेऊन स्वतंत्र चौकशी केली. त्यांच्या जबाबातील विसंगती लक्षात आल्यानंतर कसून चौकशी केली असता, दोघांनीही थरारक हत्येची कबुली दिली.

सीडीआरमधून गुन्ह्याला फुटली वाचा

या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यानंतर सुनिता आणि राहुल यांनी जुने मोबाईल व सिमकार्ड बदलून नवे हँडसेट वापरण्यास सुरुवात केली. मात्र तांत्रिक तपासादरम्यान राहुलचे वेगवेगळ्या क्रमांकांवरून केवळ सुनिताशीच सातत्याने संपर्क असल्याचे ‘सीडीआर’मधून समोर आले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in