अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पोलिसांना 'क्लीनचीट'

बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना निर्दोषत्व बहाल करण्यात आले आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना ही ‘क्लीनचीट’ देण्यात आली आहे. स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा न्यायालयीन आयोगाने मान्य केला आहे.
अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात पोलिसांना 'क्लीनचीट'
Published on

नवी मुंबई : बदलापूरच्या शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना निर्दोषत्व बहाल करण्यात आले आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या न्यायालयीन आयोगाकडून पोलिसांना ही ‘क्लीनचीट’ देण्यात आली आहे. स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेंवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा न्यायालयीन आयोगाने मान्य केला आहे.

न्या. दिलीप भोसले यांच्या आयोगाने ‘स्वसंरक्षणासाठी’ अक्षय शिंदेवर गोळीबार केल्याचा पोलिसांचा दावा मान्य केला आहे. या निर्णयामुळे एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना कायदेशीर दिलासा मिळाला आहे. यापूर्वी अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार केली नसल्यामुळे राज्य मानवाधिकार आयोगाकडूनही पोलिसांना ‘क्लीनचीट’ मिळाली होती.

गोळीबार स्वसंरक्षणासाठी झाल्याचा दावा मान्य केला असला तरी, आयोगाने आरोपीला व्हॅनमधून नेण्याच्या प्रक्रियेवर मात्र काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आयोगाने या प्रक्रियेत काही त्रुटी आढळल्याचे संकेत दिले आहेत. पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदेच्या केलेल्या एन्काउंटरवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ‘एसआयटी’ स्थापन करून चौकशीचे आदेश दिले होते. तर ही ‘एसआयटी’ कोर्टाने नव्हे, तर ‘डीजीपीं’ना स्थापन करावी, असे आदेश सुप्रीम कोर्टाचे होते. आता न्या. दिलीप भोसले आयोगानेही पोलिसांना निर्दोष ठरवल्याने या वादावर पडदा पडण्याची शक्यता आहे

प्रकरण काय?

ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शाळेतील सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याला मुख्य आरोपी ठरवण्यात आले होते. २३ सप्टेंबर २०२४ रोजी अक्षय शिंदे याचा तळोजा तुरुंगात नेत असताना पोलीस चकमकीत मृत्यू झाला होता. हा एन्काउंटर बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर एन्काउंटरची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्यात आली. ‘एसआयटी’ चौकशीनंतर मुंबई हायकोर्टाने या प्रकरणात पाच पोलिसांना जबाबदार धरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in