उमटे धरणातून शेवाळेमिश्रित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. धरणाने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे.
उमटे धरणातून शेवाळेमिश्रित पाणीपुरवठा; नागरिकांचे आरोग्य धोक्यात

धनंजय कवठेकर/ अलिबाग

अलिबाग तालुक्यातील उमटे धरणातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. धरणाने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे धरणातून शेवाळेमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. हजारो नागरिक दूषित पाणी पीत असल्याने जलजन्य आजार होण्याची भीती वर्तवली जात आहे. रायगड जिल्हा परिषद ६० हजारांहून अधिक नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे बोलले जात आहे.

अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये १९७८-७९ या कालावधीत उमटे धरण बांधण्यात आले. ४५ हून अधिक वर्षे जुन्या असलेल्या या धरणातून रामराज, सुडकोली, बोरघर, चिंचोटी, बेलोशी, खानाव, बामणगाव, वरंडे, आधी, नागाव, रेवदंडा, चौल या ग्रामपंचायत क्षेत्रातील गावांतील सुमारे ६० हजारांहून अधिक नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची पातळी कमी झाल्याने माती, गाळमिश्रित पाणी नळाद्वारे येत आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब, कावीळ, विषमज्वरसारखे जलजन्य आजार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. रायगड जिल्हा परिषदेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासनामार्फत कारभार चालत आहे. या प्रशासनाकडूनच धरणातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा होती. परंतु, प्रशासनाने तालुक्यातील ६० हजार नागरिकांची घोर निराशा केली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून धरणातून गाळमिश्रित पाणी येत असून, त्या पाण्याला दुर्गंधी येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. याबाबत जिल्हा परिषदेने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दोन दिवसाआड पाणीपुरवठा

धरणांतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत धरणातील पाण्याचा पुरवठा करणे गरजेचे आहे. त्यानुसार अलिबाग पंचायत समिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पाणी कपातीला सुरुवात करण्यात आली आहे. एक एप्रिलपासून दर दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन उपअभियंता चवरकर यांनी केले आहे.

"उमटे धरण आणि त्यातील शेवाळे, मातीमिश्रित पाणी हे दरवर्षीचे दुखणे आहे. रा. जि. परिषदेच्या क्षेत्रात हे धरण आहे. धरणामध्ये पुरेसा पाण्याचा साठा नसताना धरणाच्या बाहेर पाइपलाईन टाकायला कोट्यवधींचा निधी उपलब्ध होतो; पण, धरणातील 'गाळ' काढण्यासाठी नाही, ही मोठी शोकांतिका आहे. खरं तर, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय आम्हाला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळणार नाही." -ॲड. राकेश नारायण पाटील

"उमटे धरणात ४३ मीटरपर्यंत पाण्याची पातळी आहे. धरणातील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे. शेवाळेमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यावर पर्याय म्हणून पाण्याची तपासणी करून जलशुद्धीकरणासाठी टीसीएल पावडरचा वापर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत." -नेहाल चवरकर, उपअभियंता, अलिबाग पंचायत समिती, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in