
मुंबई : एका ५० वर्षीय शाळेतील शिक्षकाने अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. कर्जाच्या त्रासाला कंटाळून ही आत्महत्या केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने रविवारी दिली.
शिक्षकाच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात या शिक्षकाने तत्काळ कर्ज देणाऱ्या एका ॲपद्वारे काही रक्कम घेतली होती. कर्जफेड न करू शकल्यामुळे, त्या कर्ज ॲप कंपनीच्या वसुली एजंटांनी गेल्या आठवडाभर या शिक्षकाला वारंवार फोन करून बदनामी करण्याची धमकी दिली होती, असे या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, वसुली एजंटांनी छेडछाड केलेले शिक्षकाचे फोटो त्याच्या संपर्कातील व्यक्तींना आणि व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये पाठवले होते, अशी माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.
शुक्रवारी हा शिक्षक कारने अटल सेतूवर आला आणि गाडीतून उतरून पुलावरून पाण्यात उडी घेतली. पुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली. या शिक्षकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी न्हावा खाडीमध्ये सापडल्याचे पोलिसांनी सांगितले.