जानेवारीत फळांच्या राजाची विक्रमी आवक; अवकाळी पावसामुळे एप्रिलमध्ये पडणार तुटवडा

दुसरीकडे कोकण पट्ट्यात काही दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने एप्रिल महिन्यात येणाऱ्या आंब्यांचा मोहर गळून पडल्याने ऐन उन्हाळ्यात आवक घटणार आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जानेवारीत फळांच्या राजाची विक्रमी आवक; अवकाळी पावसामुळे एप्रिलमध्ये पडणार तुटवडा
Published on

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्यात दुसऱ्यांदा हापूसची आवक झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जानेवारीतील ही ऐतिहासिक आवक असल्याचा दावा व्यापाऱ्यांनी केला आहे. तर दुसरीकडे कोकण पट्ट्यात काही दिवसापूर्वी पडलेल्या अवकाळी पावसाने एप्रिल महिन्यात येणाऱ्या आंब्यांचा मोहर गळून पडल्याने ऐन उन्हाळ्यात आवक घटणार आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

यंदाचा हापूस हा डिसेंबरमध्येच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत दाखल झाला. अर्थात हा हापूस कोकण किंवा जुन्नर पट्ट्यातून नव्हता तर आफ्रिका खंडातील मलावी म्हणून ओळखला जाणारा होता. मात्र त्यानंतर त्याची आवक झाली नाही. तर दुसरी आवक ही १८ जानेवारीला झाली. अमोल शिंदे या व्यापाऱ्याकडे दोन पेट्या रत्नागिरी हापूस आला होता. अशा प्रकारे कमी-अधिक प्रमाणात जानेवारीत हापूस आवक होत असते. मात्र २९ तारखेला कृषी उत्पन्न बाजारपेठेत तब्बल ३६० पेट्या कोकणातून आल्या. त्यात देवगड २५० पेट्या रत्नागिरी ८० माणकोट ४० पेट्या असल्याचे पहावयास मिळत आहे. आता आलेला हापूस हा गेल्या वर्षीच्या ॲाक्टोंबर महिन्यातील आहे.

कोकणातील हापूस आंबा आवक एप्रिलमध्ये अत्यल्प होईल. याचे महत्वाचे कारण म्हणजे काही महिन्यांपूर्वी हापूस पिकणाऱ्या कोकण पट्ट्यात झालेला अवकाळी पाऊस आणि त्या पाठोपाठ थ्रीप्स रोगाचा प्रादुभात मोठ्या प्रमाणावर झाल्याने उत्पादन खूप कमी होण्याची भीती शेतकऱ्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र सध्या ज्या आंबा झाडांना मोहर आला आहे, तो खूप चांगला असून जर काही नैसर्गिक संकट आले नाही तर मे महिन्यात प्रचंड आवक होण्याची शक्यता आहे.

- संजय पानसरे, व्यापारी फळ मार्केट

प्रतिपेटी १० ते १५ हजार रुपये

जानेवारीतील ही आजपर्यंतची विक्रमी आवक समजली जाते. जानेवारीत आतापर्यंत केवळ २५ ते ३० पेटी हापूस आवक होत होती. मात्र आता एकदम ३६० पेट्या आवक झाल्याने त्यामुळे ही ऐतिहासिक आवक म्हणूनची चर्चा एपीएमसी फळ बाजारात रंगू लागली आहे. याचा दर प्रतिपेटी १० ते १५ हजार रुपयांपर्यंत गेला आहे.

logo
marathi.freepressjournal.in