धर्माधिकारी यांनी समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली!

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान
धर्माधिकारी यांनी समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली!

वीरता, भक्ती व सामाजिक चेतना या तीन मार्गांनी देशाला दिशा देण्याचे काम महाराष्ट्राने केले आहे. महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनीही समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, समाजबांधवांसाठी काम करण्याची शिकवण दिली आहे. या देशाला ‘सर्वे भवन्तु सुखिनः’ या मंत्राची आवश्यकता असताना लाखो लोकांची फळी उभी करण्याचे काम अप्पासाहेबांनी केले आहे, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आणि पद्मश्री डॉ. अप्पासाहेब ऊर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांना रविवारी लाखो श्री सदस्यांच्या उपस्थितीत २०२२ सालचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते देण्यात आला.

नवी मुंबईतील खारघर येथील कार्पोरेट पार्कच्या मैदानावर २० लाखांहून अधिक श्री सदस्यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय पंचायतीराज राज्यमंत्री कपिल पाटील, रायगडचे पालक मंत्री उदय सामंत, ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रशांत ठाकूर, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, धर्माधिकारी प्रतिष्ठानचे डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

“कोणत्याही प्रसिद्धीची आस न ठेवता समाजसेवा करणारा हा एवढा मोठा जनसमुदाय मी आयुष्यात पहिल्यांदा पाहत आहे. या प्रकारचा मान, सन्मान, भक्तिभाव हा केवळ त्याग, समर्पण व सेवेद्वारेच मिळत असतो. अप्पासाहेबांप्रती आपले प्रेम, विश्वास व सन्मान हा त्यांच्या संस्काराचा, कर्तृत्वाचा व नानासाहेबांच्या शिकवणीचा सन्मान आहे. एकाच परिवारात अनेक वीर जन्मलेले मी पाहिले आहेत. मात्र, समाजसेवेचे संस्कार तीन तीन पिढ्यांपर्यंत असलेले मी आयुष्यात प्रथमच पाहत आहे. डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण सन्मान देऊन, लाखो लोकांना जीवन जगण्याची प्रेरणा देण्याचे त्यांच्यासारखेच काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबद्दल त्यांचे व राज्य शासनाचे मी अभिनंदन करतो,” असेही अमित शहा यांनी सांगितले.

महान छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यभूमीने देशाला तीन मार्ग दाखविले. राष्ट्रासाठी जीवन अर्पण करण्याचा वीरतेचा मार्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केला. स्वातंत्र्यवीर सावरकर, चाफेकर बंधू, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, लोकमान्य टिळकांनी स्वराज्य, सन्मानासाठी आपले जीवन अर्पिले. संतपरंपरेचा अध्यात्मिक मार्ग हा दुसरा मार्ग या भूमीने दिला आहे. समर्थ रामदास, संत तुकाराम महाराजांपासून नामदेवांपर्यंत या सर्वांनी महाराष्ट्रातील भक्तीच्या, अध्यात्माच्या मार्गाचे देशाचे नेतृत्व करण्याचे काम केले आहे. सामाजिक चेतनेचा तिसरा मार्गही येथूनच सुरू झाला. तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक सामाजिक आंदोलनाचे जनक महाराष्ट्राची भूमी आहे. ही सामाजिक चेतना जागृत करण्याचे व ती पुढे नेण्याचे काम नानासाहेब, अप्पासाहेबांनी सुरू ठेवले आहे. समाजासाठी, दुसऱ्यांसाठी जगण्याची शिकवण देण्याचे काम या भूमीने केले आहे. समाजासाठी, दुसऱ्यांसाठी, बांधवांसाठी काम करण्याची शिकवण अप्पासाहेबांनी दिली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊनच भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले, असेही त्यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in