

नवी मुंबई : नेरूळ येथील शिवस्मारक अनावरणप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी नोटीस बजावण्याच्या उद्देशाने नेरूळ पोलीस बुधवारी मनसे नेते अमित ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी गेले, मात्र अमित ठाकरे यांनी नोटीस स्वीकारण्यास नकार देत ती स्वतः नेरूळ पोलीस ठाण्यात जाऊन स्वीकारणार असल्याचे सांगितले. तथापि, ते ठाण्यात नेमके कधी हजर राहणार याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. परिणामी पोलिसांना नोटीस परत घेऊन नवी मुंबईला परतावे लागले.
राजीव गांधी उड्डाणपुलाजवळ उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विनापरवानगी अनावरण अमित ठाकरे यांनी मनसैनिकांसह केल्याचा आरोप आहे. या वेळी मोठ्या संख्येने जमाव जमवून मोर्चा काढण्यात आला, पोलीस अडथळा आल्यावर धक्काबुक्कीचा प्रकार घडला तसेच पुतळ्याभोवती लावलेल्या सुरक्षा जाळ्यांचे नुकसान करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी अमित ठाकरे आणि सुमारे ४० मनसैनिकांवर जमावबंदी आदेशाचे उल्लंघन, बेकायदेशीर मोर्चा, सरकारी कामात अडथळा, पोलिसांशी धक्काबुक्की आणि महापालिकेच्या साहित्याचे नुकसान आदी विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नोटीस स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर आता नेरूळ पोलिस ठाकरे यांच्या स्वयंसहभागाची प्रतीक्षा करत आहेत. पुढील चौकशीसाठी ते कधी नेरूळ पोलिस ठाण्यात हजर राहतात याकडे लक्ष लागले आहे.