८८ वर्षीय वृद्धाला त्यांच्या सख्ख्या मुलाने घराबाहेर काढले

८८ वर्षीय वृद्धाला त्यांच्या सख्ख्या मुलाने घराबाहेर काढले

वाशी भागात राहणाऱ्या रायचंद कानजी शहा या ८८ वर्षीय वृद्धाला त्यांच्या सख्ख्या मुलाने आणि सुनेने सांभाळ करण्यास नकार देऊन घरातून हाकलून लावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाशी पोलिसांनी सदर प्रकाराची गंभीर दखल घेऊन रायचंद यांचा सांभाळ करण्यास नकार देणारा त्यांचा मुलगा व सुनेवर गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील तक्रारदार रायचंद शहा हे वाशी सेक्टर-१५ मधील एलोरा बिल्डींगमध्ये राहण्यास आहेत. रायचंद यांना तीन मुले व एक मुलगी असून वाशीमध्ये ते १९९३पासून मुलगा अश्विन शहा, सुन अवनी शहा व नातु यांच्यासह राहण्यास आहेत. रायचंद यांच्या पत्नीचा फेब्रुवारी २०२१ मध्ये मृत्यू झाला आहे. रायचंद यांच्या नावे तीन वेगवेगळ्या कंपन्या असून जुलै २०२० मध्ये त्यांचा मुलगा अश्विन शहा याने कोऱ्या चेकवर त्यांच्या सह्या घेऊन त्यांच्या खात्यातून तब्बल ८८ लाख रुपये परस्पर काढून घेतले. त्यानंतर मागील दोन वर्षांपासून त्यांचा मुलगा व सुन या दोघांनी त्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यास सुरुवात केल्याचे तसेच जोपर्यंत सर्व संपत्ती त्यांच्या नावावर करत नाही तोपर्यंत येथे राहायचे नाही, असे बोलून त्यांना शिवीगाळ करणे, जेवण-पाणी वेळवर न देणे अशा प्रकारे त्यांना त्रास देत असल्याचे रायचंद यांचे म्हणणे आहे.

१६ मे रोजी रात्री मुलगा व सुन यांनी दमदाटी करुन दुसऱ्या दिवशी त्यांचे सामान घरातून बाहेर फेकून देत त्यांना देखील घरातून बाहेर काढले. त्यामुळे रायचंद यांनी आपल्या नातेवाईक व मित्रमंडळीकडे आसरा घेऊन वाशी पोलीस ठाण्यात आपला मुलगा व सुनेविरोधात तक्रार दाखल केली. वाशी पोलिसांनी देखील सदर प्रकाराची गंभीर दखल घेऊन आपल्या वडीलांचा सांभाळ करण्यास नकार देऊन त्यांना घरातून बाहेर काढणारा मुलगा व सुनेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in