नवी मुंबई : चोरी करण्यासाठी आलेल्या तरुणांना ट्रेलरचालकांनी बेदम मारहाण केल्याने जखमी झालेल्या त्यातील एका तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर न्हावाशिवा पोलिसांनी सदर तरुणाला मारहाण करणाऱ्या चौघा ट्रेलरचालकाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सदर घटना गत ३ एप्रिल रोजी न्हावाशेवा येथील चांदणी चौकात घडली होती.
या घटनेतील मृत रौफ अकबर मोहम्म खान (२०) हा व त्याचे दोघे मित्र शाहरूख हुसेन खान व रोहन हे तिघे गत ३ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास जेएनपीटी येथील चांदणी चौक येथे रोडकडेला पार्क असलेल्या ट्रेलरमधून चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते. यावेळी ट्रेलरमध्ये झोपलेल्या चालकाला जाग आल्याने त्याने तिघांना हटकले. यावरून त्यांच्यामध्ये वाद झाल्याने रोहनने दगड मारून सदर ट्रेलरची काच फोडली. त्यामुळे चिडलेल्या सदर ट्रेलरचालकाने त्याच्या इतर साथीदारांना बोलावून घेऊन तिघांचा पाठलाग करून त्यांच्यापैकी रोहनला पकडून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याला सोडविण्यासाठी रौफ अकबर खान हा मध्ये गेला. यावेळी ६ ते ७ ट्रेलरचालकांनी एकत्र येऊन रौफ खान याला बेदम मारहाण केली.
यावेळी एका ट्रेलरचालकाने त्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरात फटका मारल्याने रौफ अकबर खान हा गंभीर जखमी झाला. त्यामुळे त्याला प्रथम उरण येथील रुग्णालयात व नंतर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.