नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने बुधवारी तळोजा येथील पेंधर फाटा ब्रिजजवळ अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या एका तरुणाला अटक केली आहे. अरशद करार खान (२८) असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याच्याजवळ असलेले तब्बल ५० लाख रुपये किमतीचे ५०० ग्रॅम वजनाचे एमडी(मेफेड्रॉन) हे अमली पदार्थ जप्त केले आहे. सदरचे अमली पदार्थ त्याने कुठून आणले तसेच ते कुणाला विकणार होता, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे.
तळोजा येथील पेंधर फाटा ब्रिजजवळ अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास तळोजा येथील पेंधर फाटा ब्रिजजवळ सापळा रचण्यात आला होता. त्याठिकाणी ७.३० वाजण्याच्या सुमारास अरशद करार खान हा संशयास्पदरीत्या आला असताना, अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्या जवळ ३० प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये तब्बल ५० लाख रुपये किमतीचे ५०० ग्रॅम वजनाचे एमडी(मेफेड्रॉन) हे अमली पदार्थ आढळून आले. त्यानंतर पोलिसांकडून सदरचे अमली पदार्थ जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये अटक करण्यात आलेल्या तरुणावर तळोजा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात असून त्याने सदरचे अमली कोणाकडून आणले, तसेच ते कोणाला विकणार होता? याबाबत पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांनी दिली.