मसाला मार्केटच्या पुनर्विकासाला गती; मध्यवर्ती सुविधा इमारतीच्या पुनर्बांधणीला मंजुरी

वीज आणि पाणीपुरवठा बंद केल्यानंतर धोकादायक घोषित झालेली मध्यवर्ती सुविधा इमारतीच्या पुनर्विकासाला गती मिळाली आहे. याबाबत नुकतीच व्यापाऱ्यांची बैठक पार पडली असून वेळेवर काम पूर्ण करणे कामात पारदर्शकता आणणे आदी अटींवर सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत असलेली ही इमारत नव्याने उभी केली जाणार आहे.
मसाला मार्केटच्या पुनर्विकासाला गती; मध्यवर्ती सुविधा इमारतीच्या पुनर्बांधणीला मंजुरी
एपीएमसी मार्केट प्रातिनिधिक फोटो
Published on

नवी मुंबई : वीज आणि पाणीपुरवठा बंद केल्यानंतर धोकादायक घोषित झालेली मध्यवर्ती सुविधा इमारतीच्या पुनर्विकासाला गती मिळाली आहे. याबाबत नुकतीच व्यापाऱ्यांची बैठक पार पडली असून वेळेवर काम पूर्ण करणे कामात पारदर्शकता आणणे आदी अटींवर सर्व व्यापाऱ्यांनी एकमताने मान्यता दिली आहे. त्यामुळे आता अनेक वर्षांपासून धोकादायक स्थितीत असलेली ही इमारत नव्याने उभी केली जाणार आहे.

एपीएमसीतील मसाला मार्केटमधील मध्यवर्ती सुविधा इमारतीचा (सेंट्रल फॅसिलिटी बिल्डिंग) रखडलेला पुनर्विकास प्रस्ताव अखेर मार्गी लागला असून, या इमारतीच्या पुनर्बांधणीला कार्यालयधारकांनी एकमुखी संमती दिली आहे. महापालिकेने सुमारे पाच वर्षांपूर्वी ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती. तर यावर्षी सदर इमारतीच्या अहवालानुसार ही इमारत अतिधोकादायक असल्याचा निर्वाळा स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये देण्यात आला होता. याच कारणामुळे इमारतीचा वीज आणि पाणीपुरवठा १८ जूनपासून खंडित करण्यात आला होता. या कारवाईनंतर व्यापारी खडबडून जागे झाले. या इमारतप्रकरणी विचारविनिमय करण्यासाठी १९ जून रोजी वाशीत एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत व्यापारी व कार्यालय धारकांच्या बैठकीत बहुसंख्यांनी पुनर्विकासाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या बैठकीत २७२ कार्यालयधारकांपैकी १८० हून अधिक गाळाधारक उपस्थित होते. बैठकीस संचालक विजय भुत्ता, मोहन गुरनानी, अशोक जैन, यांच्यासह अनेक प्रमुख व्यापाऱ्यांची उपस्थिती होती. बहुमताच्या आधारावर इमारतीच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.

स्वतंत्र पार्किंग सुविधा

इमारतीच्या पुनर्निमाणमध्ये प्रत्येक गाळाधारकाला १०० चौरस फूट अधिक जागा अधिकचे चटईक्षेत्र देण्यात येणार आहे. याशिवाय सर्वांना स्वतंत्र पार्किंग सुविधा असणार आहे. यासाठी पीएमसी म्हणून अर्बन ॲनालिसिस ही संस्था प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. पुनर्विकास प्रस्ताव लवकरच संचालक मंडळाच्या पुढील बैठकीत सादर केला जाणार असून, तेथे अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात होईल, अशी माहिती उपसचिव महेश साळुंखे-पाटील यांनी दिली.

अनेक वर्षांपासून इमारत धोकादायक अवस्थेत आहे. त्याचा त्रास सर्व व्यापारी व त्याच्याशी निगडित घटकांना होत आहे. उशिरा का होईना याबाबत सकारात्मक पावले उचलली गेली असून नियमांना धरून पारदर्शकता राहात पुढील निर्णय आणि कामकाज होणार आहे.

- मोहन गुरनानी, अध्यक्ष, साखर संस्था महाराष्ट्र

धोकादायक इमारतीच्या पुनर्बांधणीचा निर्णय

मसाला मार्केटमधील ही इमारत गेल्या काही वर्षांपासून जीर्ण अवस्थेत असून, डागडुजीच्या असंख्य मागण्यांनंतरही तोडगा निघत नव्हता. महापालिकेच्या ताज्या अहवालानंतर आणि मूलभूत सेवा बंद झाल्यामुळे व्यापाऱ्या पुढे पर्याय उरला नव्हता. त्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून सुरक्षित, सुविधायुक्त व आधुनिक पुनर्बांधणीचा निर्णय घेण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in