मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरु केलं आहे. जरांगे यांच्या आंदोलनाना राज्यभरातून मराठा समाजाचा पाठिंबा मिळाला आहे. आता नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीनेही या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. त्यासाठी आज एपीएमसी मार्केट पूर्ण दिवसभर बंद राहणार आहे. मार्केटमधील सर्व माथाडी कामगारांनी एकत्र येत मराठा आरक्षणास आपला पाठिंबा दर्शवला आहे. त्यासाठी हे कामगार एक दिवसीय लाक्षणिक उपोषण देखील करणार आहेत. त्यामुळे आज फळ मार्केट, फूल मार्केट, मसाला मार्केट यांसह इतरही मार्केट बंद राहणार आहेत.
कृषी उप्तत्न बाजार समितीच्या निर्णयानुसार, नरेंद्र पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत माथाडी कामगारांनी एपीएमसी मार्केट दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे.
मराठा आरक्षणच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातील आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु केलं होतं. शांततेत सुरु असलेल्या या आंदोलनावर जालना पोलिसांकडून अचाकन लाठीचार्ज करण्यात आला. त्यामुळे हे आंदोलन आणि प्रश्न अधिकच चिघळला. मनोज जरांगे पाटील यांना महाराष्ट्रभर सहानुभूती आणि पाठिंबा मिळाला. यानंतर सरकारने जरांगे यांच्याकडे मराठा आरक्षणासाठी काही वेळ मागितला. त्यानुसार राज्य सरकारला ४० दिवसांचा अवधी देण्यात आला होता. मात्र, जरांगे यांनी दिलेला ४० दिवसांचा अवधी संपल्यानंतर देखील राज्य सरकारने कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आमरण उपोषणाना बसले आहेत.
मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरु केल्याने ते मागे घ्यावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु आहेत. मंत्री गिरीष महाजन यांनी जरांगे यांनी उपोषण मागे घ्या सांगण्यासाठी फोन केला असता आरक्षण द्या, उपोषण मागे घेतो, असं जरांगे म्हणाले.
दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणाचा मुद्दा गावोगावी पोहचला आहे. आरक्षणाच्या मुद्यावरुन अनेक गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. अशात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा तोंडावर असल्याने पुढाऱ्यांना अधिक पेच निर्माण झाला आहे.