
मला मिळालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारचे श्रेय हे आपल्या सर्वांना जाते. एका घरात दोन वेळा पुरस्कार दिला जातो, अशी घटना कुठेही घडली नाही. समाजसेवेचे काम हे कधीही पूर्ण होणार नाही. या कार्यासाठी आणखी आयुष्य मिळावे, असे वाटते. त्यामुळेच शेवटच्या श्वासापर्यंत मी समाजसेवेचे काम करणार असल्याचे पुरस्काराला उत्तर देताना डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांनी सांगितले.
“हा पुरस्कार म्हणजे आपल्या कार्याचा सन्मान आहे. त्यामुळे हा पुरस्कार मी सर्वांना समर्पित करतो. या सगळ्यांचे श्रेय सर्व श्री सदस्यांना जाते. खेड्यागावातील लोकांना, त्यांच्या रितीरिवाजांना चांगले उत्तम वळण लागायला हवे, यासाठी कामाची सुरुवात केली. प्रसिद्धीपासून लांब राहत कार्य सुरू आहे. वस्तू महत्त्वाची असेल, तर तिची जाहिरात करायची गरज काय आहे. मानवता धर्म हा सर्वात श्रेष्ठ आहे, या विचारांची रुजवात अंत:करणात व्हायला हवे. शेवटच्या श्वासापर्यंत हे कार्य सुरू ठेवणार आहे. सचिनदादा हे कार्य पुढे चालविणार आहेत,” असेही अप्पासाहेबांनी सांगितले.
देशाचे, आईवडिलांचे, समाजाचे ऋण फेडण्यासाठी काय सेवा केली, हे प्रत्येकाने ठरविले पाहिजे. त्यासाठी प्रत्यक्ष काम केले पाहिजे. समाजसेवा ही सर्वात श्रेष्ठ आहे. त्यासाठी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान उभे केले. त्यासाठी प्रत्येकाने किमान पाच पाच झाडे लावायला हवीत. त्यामार्फत वृक्षारोपणाचे काम सुरू आहे. देशातील प्रत्येक मानवाचे आरोग्य सुदृढ असावे व आनंद आयुष्य जगावे, यासाठी आरोग्य शिबीर घेत आहोत. रक्तदान व थॅलेसिमेया रुग्णांसाठी रक्तपुरवठा ही पण एक समाजसेवा आहे. आजपासून प्रत्येकाने ही सेवा सुरू करावी. समाजसेवेबरोबरच अस्थिर मनाला स्थिर करण्यासाठी अंतःकरणाची स्वच्छता करायला हवी. प्रत्येक माणसाने अंतर्आत्म्यामध्ये राहिले तरच उत्तम सामर्थ्य मिळेल. समाजसेवेचे हे काम अखंड सुरूच राहणार आहे. सत्कीर्ती वाढवावी व अपकीर्ती थांबवावी. कीर्ती वाढविण्यासाठी मेहनत करावी, असा उपदेशही धर्माधिकारी यांनी यावेळी दिला.