अश्विनी बिद्रे हत्याप्रकरणी युक्तिवाद संपला; आता प्रतीक्षा निकालाची; सहा वर्षे मॅरेथॉन सुनावणी

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्याचा अंतिम युक्तिवाद आता संपला आहे. त्यामुळे आता सगळ्यांनाच अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. या खटल्याची मॅरेथॉन सुनावणी गेल्या सहा वर्षे सुरू होती.
अश्विनी बिद्रे
अश्विनी बिद्रे संग्रहित छायाचित्र
Published on

नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्याचा अंतिम युक्तिवाद आता संपला आहे. त्यामुळे आता सगळ्यांनाच अश्विनी बिद्रे हत्याकांडाच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. या खटल्याची मॅरेथॉन सुनावणी गेल्या सहा वर्षे सुरू होती. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आपला लेखी युक्तिवाद अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्यापुढे सादर केला आहे. त्यामुळे या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, राजू पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांचा फैसला आता लवकरच होणार आहे.या खटल्याचा निकाला येत्या दोन महिन्यांत लागणार असल्याची शक्यता कायदे तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अभय कुरुंदकर आणि अश्विनी बिद्रे यांच्यात प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधातून कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी रात्री मीरा रोड येथे अश्विनी यांची हत्या केल्यानंतर अश्विनीच्या मृतदेहाचे तुकडे करून ते फ्रीजमध्ये ठेवले होते. दुसऱ्या दिवशी कुरुंदकर यांने सदर मृतदेहांचे तुकडे भरलेली गोणी वसई खाडीत फेकून दिली होती. अश्विनी बीद्रे अचानक बेपत्ता झाल्यानंतर कळंबोली पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.

आरोपींची धरपकड

अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता शिंदे अल्फान्सो यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी या गुन्ह्याचा तपास करत ७ डिसेंबर २०१७ रोजी कुरुंदकरला या गुन्ह्यात अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी दुसरा आरोपी राजू पाटील याच्या मुसक्या आवळल्या. त्या पाठोपाठ १८ फेब्रुवारी २०१८ रोजी कुंदन भंडारी आणि २४ फेब्रुवारी २०१८ रोजी महेश फळणीकर हे गजाआड झाले. या आरोपींची कसून चौकशी झाल्यानंतर १ मार्च २०१८ रोजी अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा गुन्हा दाखल झाला.

याचिकाकर्त्यांच्या पसंतीच्या सरकारी वकिलांची नियुक्ती

अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांच्या मागणीनुसार शासनाने या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून प्रदीप घरत यांची नियुक्ती केली. मात्र सुरुवातीला त्यांना नवी मुंबई पोलिसांचे अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यांचे मानधन विनाकारण रखडवून ठेवण्यात आले. त्यासाठी अश्विनी यांच्या नातेवाईकांना संघर्ष करावा लागला. या संघर्षातून आता खटल्याचा अंतिम युक्तिवाद ६ वर्षांच्या सुनावणीनंतर पूर्ण झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in