
नवी मुंबई : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तुर्भे एमआयडीसीतील बंगाली पाडा आणि कोपरीगाव सेक्टर-२६ परिसरात बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या ७ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. यात १ पुरुष आणि ६ महिलांचा समावेश आले. हे सर्व बांगलादेशी नागरिक ७ ते १४ वर्षांपासून मजुरी व घरकाम करून नवी मुंबईत राहत असल्याचे त्यांच्या चौकशीतून समोर आले.
तुर्भे एमआयडीसीतील मयुर कोल्ड स्टोरेजसमोरील रोडवर भरत नगर, बंगाली पाडा येथे काही बांगलादेशी नागरीक कामावर जाण्यासाठी येणार असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे व त्यांच्या पथकाने तुर्भे एमआयडीसीतील बंगाली पाडा येथे छापा मारला. यावेळी त्याठिकाणी रेणू लुफर सरदार (४६), शर्मिला बिवी सत्तार शेख (३४), अमिना साउदीन खातुन (६) व सिद्दीक अकबर सरदार (३२) हे सापडले. तिघांच्या चौकशीत त्यांच्याकडे भारतीय नागरिकत्वाचा कोणताही पुरावा नसल्याचे तसेच त्यांनी घुसखोरीच्या मार्गाने भारत बांगलादेश सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून वैध प्रवासी कागपत्रांशिवाय भारतात प्रवेश केल्याचे आढळून आले.
या कारवाईनंतर कोपरीगाव सेक्टर-२६ मधील साईबाबा मंदिर गेटजवळ देखील काही बांगलादेशी महिला बेकायदेशीररीत्या वास्तव्य करीत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे एएचटीयूच्या पथकाने कोपरी गाव सेक्टर-२६ भागात छापा मारून फातीमा बरकत शेख (२७), अल्पना बोरहन शेख (२८), सपना किसनदेव पांडे उर्फ मोमिना रोबीयो खातुन (३५) व नैनू इयाईल शेख (४०) या चार महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे देखील कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याचे तसेच त्यांनी देखील घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश केल्याचे चौकशीतून समोर आले. त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली.