बेलापूरमध्ये स्वरसम्राज्ञीला सुरेल मानवंदना; आशाताईंच्या आठवणींना उजाळा

दिवंगत स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना बेलापूर येथे सुरेल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अभी ना जाओ छोड़कर… सारख्या अजरामर गीतांच्या सुरावटींनी भारलेला ‘स्वरांजली’ हा विशेष कार्यक्रम बेलापूर येथे उत्साहात पार पडला.
बेलापूरमध्ये स्वरसम्राज्ञीला सुरेल मानवंदना; आशाताईंच्या आठवणींना उजाळा
Published on: 

नवी मुंबई : दिवंगत स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना बेलापूर येथे सुरेल श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अभी ना जाओ छोड़कर… सारख्या अजरामर गीतांच्या सुरावटींनी भारलेला ‘स्वरांजली’ हा विशेष कार्यक्रम शनिवारी सेक्टर ६, बेलापूर येथे उत्साहात पार पडला.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ आणि सुप्रसिद्ध गायिका अर्चना भंडारे यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आशाताईंचा संघर्ष, त्यांचे संगीत क्षेत्रातील योगदान आणि त्यांच्या आठवणींचा सुरेल प्रवास रसिकांना अनुभवता आला. गायिका अर्चना भंडारे यांनी आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणातून वातावरण ‘आशामय’ केले. युगल गीतांसाठी अजयजी आणि रवींद्रजी यांनी साथ दिली. सूत्रसंचालक विनय मोरे यांनी आशाताईंच्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रम अधिक रंगतदार केला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय संगीताचा वारसा जिवंत ठेवण्याचा आणि अभिजात गायकी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचे अर्चना भंडारे यांनी सांगितले. तसेच नवी मुंबईत स्थानिक कलाकारांच्या माध्यमातून असे सांस्कृतिक उपक्रम अधिक प्रमाणात व्हावेत, असे मत डॉ. जयाजी नाथ यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in