नवी मुंबई : सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर, राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांचे ३१३ चे स्टेटमेंट संपले आहे. त्यामुळे या खटल्यात येत्या २६ जुलैपासून वकिलांचा अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे. सुरुवातीला विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांचा युक्तिवाद होणार असून त्यानंतर आरोपींचे वकील विशाल भानुशाली हे युक्तिवाद करणार आहेत. दोन्ही बाजूचा युक्तिवाद संपल्यानंतर पनवेल जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. पालदेवार हे निकाल जाहीर करणार आहेत.
बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याने ११ एप्रिल २०१६ रोजी मीरारोड येथे अश्विनी यांची हत्या केली होती. त्यानंतर तब्बल दीड वर्षांनी ७ डिसेंबर २०१७ रोजी कुरुंदकर याला याप्रकरणी अटक झाली. त्याच्या अटकेनंतर तीन दिवसांनी १० डिसेंबर २०१७ रोजी पोलिसांनी दुसरा आरोपी राजेश पाटील याच्या मुसक्या आवळल्या. फेब्रुवारी २०१८ मध्ये कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर यांना गजाआड करण्यात आले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो यांनी याप्रकरणी मार्च २०१८ मध्ये हत्येचा गुन्हा दाखल केला. सुरुवातीला या खटल्याचे कामकाज अलिबाग सत्र न्यायालयात सुरू होते. मात्र पनवेल येथे सत्र न्यायालय सुरू झाल्यानंतर २०१९ मध्ये हा खटला पनवेल न्यायालयात वर्ग करण्यात आला.
याप्रकरणी न्यायालयाने आतापर्यंत ८५ साक्षीदार तपासले आहेत. त्यामध्ये अश्विनी यांचा भाऊ अनंत बिद्रे, पती राजू गोरे यांचाही समावेश आहे. सर्व साक्षीदारांची साक्ष तपासल्यानंतर न्यायाधीश के. जी. पालदेवार यांच्यासमोर सर्वच आरोपींचे ३१३ नुसार स्टेटमेंट नोंदविणे सुरू करण्यात आले. हे स्टेटमेंट नोंदवण्याचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या २६ जुलैपासून दोन्ही बाजूच्या वकिलांचा अंतिम युक्तिवाद सुरू होणार आहे. हा युक्तिवाद संपल्यानंतर पनवेल न्यायालय या खटल्याचा निकाल देणार आहे.
खटल्याचे कामकाज आठवड्यातून दोन दिवस चालवण्याची मागणी
अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्याचे गांभीर्य ओळखून या खटल्याचे कामकाज आठवड्यातून दोन दिवस चालवण्यात यावे, अशी मागणी फिर्यादी पक्षाच्या बाजूने करण्यात आली आहे. ही मागणी न्यायालयाने मान्य केली तर येत्या ऑगस्टपासून खटल्याचे कामकाज प्रत्येक आठवड्याच्या शुक्रवारी आणि शनिवारी चालणार आहे. या खटल्याचा अंतिम युक्तिवाद करण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना कमीत कमी दहा तारखांची गरज भासणार आहे, तर त्याच तुलनेत आरोपींचे वकील विशाल भानुशाली यांचाही युक्तिवाद चालणार आहे.
आता लक्ष निकालाकडे
सहा वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्याच्या अंतिम सुनावणीला सुरुवात होणार असल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष निकालाकडे लागले आहे. या खटल्याचे कामकाज संपवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.