अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी आणखी दोन साक्षीदारांची तपासणी पूर्ण

पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी.पढेलवार यांच्या न्यायालयात अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे.
अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी 
आणखी दोन साक्षीदारांची तपासणी पूर्ण

सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडप्रकरणी पनवेल सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात सायबरतज्ज्ञ अमित गाडेकर आणि पोलीस उपनिरीक्षक राजू बैकर या दोन साक्षीदारांची सर तपासणी करण्यात आली. या दोन्ही साक्षीदारांनी नोंदवलेल्या साक्षीमुळे अश्विनी यांना मारहाण केल्याचे व्हिडीओ आणि अश्विनी बिद्रे यांची हत्या झाल्यानंतर त्या जिवंत आहेत, हे भासवण्यासाठी आरोपी अभय कुरुंदकर याने अश्विनीच्या मोबाईलवरुन पोलीस विभागाला सुट्टी मिळण्यासाठी पाठवलेले मेसेज, यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. येत्या शुक्रवारी या दोन्ही साक्षीदारांची आरोपीचे वकील उलट तपासणी घेणार आहेत.

पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी.पढेलवार यांच्या न्यायालयात अश्विनी बिद्रे हत्याकांड खटल्याची सुनावणी सुरू आहे. सायबर संगणकतज्ज्ञ रोशन बंगेरा यांची साक्ष पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने सायबरतज्ञ अमित गाडेकर आणि राजू बैकर यांची साक्ष नोंदवली. गाडेकर यांनी अश्विनी यांच्या लॅपटॉपच्या हार्ड डिस्कमधून मोठ्या प्रमाणात डाटा रिकव्हर केला होता. कुरुंदकरने केलेल्या मारहाणीचे अनेक व्हिडीओ या लॅपटॉपमध्ये सेव्ह करण्यात आले होते. या सर्व पुराव्यांवर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

अश्विनी यांची हत्या ११ एप्रिल २०१६ रोजी रात्री झाली. त्यानंतर अश्विनी या जिवंत आहेत हे भासविण्यासाठी आरोपी अभय कुरुंदकर याने त्याच दिवशी अश्विनी यांच्या मोबाईलवरुन पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांना मेसेज पाठवून आपण आजारी असल्याचे व उपचार घेण्यासाठी दुसऱ्या राज्यात जात असल्यामुळे रजा देण्यात यावी असे नमूद केले होते. या मेसेजची प्रिंटआऊट पोलीस उपनिरीक्षक राजू बैकर हे शेवाळे यांच्याकडून घेऊन आले होते. त्यांचीही साक्ष शुक्रवारी पनवेल न्यायालयात नोंदवण्यात आली.

दोन्ही साक्षीदारांची सर तपासणी विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी घेतली. यावेळी न्यायालयात सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता अल्फान्सो आणि नवी मुंबई गुन्हे शाखेतील अधिकारी उपस्थित होते. या सुनावणी दरम्यान कुरुंदकरसह राजेश पाटील, कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या आरोपींनाही न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुढील सुनावणी येत्या १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in