
मुंबई : मुंबईवरून नवी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी बराच वळसा घालावा लागत असल्याने तसेच वाहतूककोंडी फोडण्यासाठी बनवण्यात आलेल्या अटल सेतूला वाहनचालकांची चांगलीच पसंती मिळत असल्याचे दिसत आहे.
अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) १३ जानेवारी २०२४ पासून सर्वसामान्यांच्या वापरासाठी खुला करण्यात आला. जानेवारी २०२४ पासून आतापर्यंत अटल सेतूवरुन तब्बल १.३ कोटींपेक्षा जास्त वाहनांनी प्रवास केला आहे. अटल सेतूचा सर्वाधिक वापर खासगी वाहनांनी केल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएने दिलेल्या आकडेवारीनुसार, १३ जानेवारी २०२४ ते २४ जुलै २०२५ या कालावधीमध्ये २२ किमी लांबीच्या अटल सेतूवरून एकूण १ कोटी ३१ लाख ६३ हजार १७७ वाहनांनी प्रवास केला आहे. त्यापैकी १.२ कोटींपेक्षा जास्त गाड्या या खासगी आहेत. अटल सेतूवरील वाहतुकीपैकी ९१ टक्के प्रवास खासगी वाहनांनी केला आहे.
उर्वरित वाहतुकीमध्ये हलकी वाहने (एलसीव्ही मिनीबस), बस, ट्रक, मल्टी-ॲक्सल वाहने यांच्यासह मोठ्या आकाराच्या वाहनांचा समावेश आहे. एलसीव्ही मिनीबसने अटल सेतूवर १,७१७११ फेऱ्या मारल्या आहेत. २-ॲक्सल बस आणि ट्रकने २,०२,८६४ फेऱ्या मारल्या आहेत. मध्यम-जड मल्टी-ॲक्सल वाहनांनी एकत्रितपणे ७,००,९८९ फेऱ्यांचा प्रवास केला आहे. १,५३७ मोठ्या आकाराच्या वाहनांनी अटल सेतूने प्रवास केला आहे.
२१.८० किमी लांबी व त्यापैकी १८.१८ किमी लांबी समुद्रावरून असलेला 'अटल सेतू' हा देशातील सर्वाधिक लांबीचा सागरी पूल आहे. देशातील सर्वात लांब सागरी लिंक असलेल्या या पुलामुळे मुंबई आणि नवी मुंबई दरम्यानचा प्रवास एका तासावरून फक्त २० मिनिटांवर आला आहे. उद्घाटनाच्या दुसऱ्या दिवशी २८,१७६ वाहनांनी पुलाचा वापर केला होता.