

नवी मुंबई : नवीन पनवेल येथे राहत असलेल्या सी.के.टी विद्यालयातील माजी मुख्याध्यापिका इंदू बाळाराम घरत यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीवर परिचितांनी डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खांदेश्वर पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानंतर रमेश घरत, त्याची पत्नी मिरा घरत, मुलगा रविराज घरत तसेच घरातील विश्वासू म्हणून राहणारी ज्योती दत्तात्रय बडवे यांच्या विरोधात मालमत्ता बळकावणे, बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक, चोरी अशा विविध कलमानुसार गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार चंदा काशीनाथ म्हात्रे या मृत इंदू घरत यांच्या मोठया बहिण आहेत. इंदू घरत या गेली ३५ वर्षे नवीन पनवेलमध्ये स्वतंत्र राहत होत्या. सी.के.टी विद्यालयात मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत असताना त्यांनी कमावलेल्या पैशातून खांदा कॉलनी, करंजाडे व उसर्ली येथे तीन घरे, दोन कार तसेच बँकांमध्ये मोठÎया रकमेच्या एफ.डी. ठेवल्या होत्या. तसेच लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने त्यांच्याकडे होते.
दरम्यान, इंदू घरत यांचा ९ जुलै २०२२ रोजी मृत्यू झाला. मात्र मृत्यूपूर्वीच त्यांच्या शेजारी राहणारे रमेश घरत व ज्योती बडवे यांनी त्यांचा मोबाईल, बँक पासबुक, पॅन कार्ड, डेबिट कार्ड आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांवर कब्जा घेतल्याचे चंदा म्हात्रे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. इंदू यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाने मालमत्तेची तपासणी केली असता, तब्बल १.२५ कोटी रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने तसेच कागदपत्रे गायब असल्याचे उघड झाले.
त्यानंतर चंदा म्हात्रे यांनी पनवेल न्यायालयात धाव घेऊन रमेश घरत, मीरा घरत, रविराज घरत, ज्योती बडवे यांनी इंदू घरत यांचे सोन्याचे दागिने, चांदीच्या वस्तू, एफ.डी. कागदपत्रे, घरांची मालकी कागदपत्रे तसेच दोन कार अशा कोटयवधींच्या मालमत्तेवर बेकायदेशीररीत्या कब्जा केल्याची तक्रार दाखल केली. तसेच आरोपी रमेश घरत व त्याच्या कुटुंबाने मृत इंदू घरत यांच्या कारची बनावट कागदपत्रे तयार करुन सदर कार स्वतच्या नावावर केल्याचे तसेच खांदा कॉलनीतील इंदू घरत यांच्या मालकीच्या स्वागत अपार्टमेंटमधील घरात सध्या आरोपी राहत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले. त्यावरुन पनवेल न्यायालयाने संबंधित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार खांदेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पुढील तपास सुरु केला आहे.
सव्वा कोटींची मालमत्ता हडप केल्याचा आरोप
या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ज्योती दत्तात्रय बडवे हिला इंदू घरत यांनी घरकाम करण्यासाठी कामाला ठेवले होते. ती लहानपणापासून इंदू घरत यांच्यासोबत राहत होती. त्यामुळे इंदू घरत यांनी तिचे शिक्षण करून तिचे लग्न लावून दिले होते. तसेच रमेश घरत व त्यांचे कुटुंबीय इंदू घरत यांच्या शेजारी राहत होते. या सर्वांनी संगनमत करुन इंदू घरत यांची तब्बल सव्वा कोटी रुपयांची मालमत्ता हडप केल्याचा आरोप आहे.