
पेण : मुंबई-गोवा महामार्गावर कर्नाळा पक्षी अभयारण्यात चोरीचा प्रकार उघडकीस आला. मात्र, एका तरुणाच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव उधळला गेला. यावेळी तीन चोरांनी तरुणाला झटका देत अंधाराचा फायदा घेत पळ काढला. त्याचवेळी त्यांनी अभयारण्यातून चोरलेले पत्रे असलेला टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.
कर्नाळा पक्षी अभयारण्य हे पर्यटकांचे आकर्षण आहे. शिवाय येथील कर्नाळा किल्ला पाहायला पर्यटकांची कायम रिघ असते. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून १० किलोमीटरवर कर्नाळा अभयारण्य आहे. येथे प्राण्यांच्या संरक्षणासाठी लोखंडी पत्रे बॉक्स लावले आहेत. गुरुवारी पहाटे दोन-अडीचच्या सुमारास अभयारण्यात हे पत्रे बॉक्स चोरून एका टेम्पोत ठेवण्यात आले. त्याचवेळी मुंबईहून पेणच्या दिशेने जाणाऱ्या तरुणाच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी गाडी थांबवली आणि एका तरुणाने पत्रे का चोरता असे विचारले. एवढेच नाही तर त्याने लगेचच पनवेल पोलिसांना मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
तरुणाने पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु केल्यानंतर आरोपींनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यात छोटीसी झटापट झाली. पहाटेची वेळ असल्यामुळे अंधार होता. त्याचा फायदा घेत ते दोन-तीन चोर संरक्षण भिंतीवरून उडी मारून जंगलात पळून गेले. तोपर्यंत त्या तरुणांनी 100 नंबरवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिल्यावर काही वेळातच निर्भया पथकाचे शिल्पा कवी आणि धनंजय पाठारे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी पहाटे साडेतीनच्या सुमारास लोखंडी पत्रे बॉक्स असलेला टेम्पो पोलिसांनी जप्त केला. दरम्यान, यापूर्वी लोखंडी पत्रे बॉक्स चोरीला गेल्याचे प्रकार घडले आहेत.