पुरस्कार सोहळा सरकारचा, खर्चाचा भार पालिकेवर; खारघर येथील महाराष्ट्रभूषण कार्यक्रमात जेवणासाठी २३ लाखांचा खर्च

या कार्यक्रमासाठी जेवणाची व्यवस्था मुंबई महापालिकेला करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते.
पुरस्कार सोहळा सरकारचा, खर्चाचा भार पालिकेवर; खारघर येथील महाराष्ट्रभूषण कार्यक्रमात जेवणासाठी २३ लाखांचा खर्च
Published on

मुंबई : खारघर येथे १६ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्रभूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. राज्य सरकारच्या वतीने आयोजित कार्यक्रमातील जेवणाच्या खर्चाचा भार मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर पडला आहे. जेवणाच्या पुरवठ्यासाठी २३ लाख ३१ हजार रुपयांचा खर्च पालिकेने केला.

राज्य सरकारच्या वतीने यंदाचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहीर करण्यात आल्यानंतर या पुरस्कार सोहळ्याचा कार्यक्रम १६ एप्रिल २०२३ रोजी नवी मुंबई खारघर येथील मैदानावर घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला गालबोट लागून उष्माघातामुळे उपस्थित साधकांपैकी १४ साधकांचा मृत्यू झाला होता. रणरणत्या उन्हात बसलेल्या साधकांना वेळेवर पाणी आणि खाण्यास काहीच उपलब्ध न झाल्याने अनेक जण चक्कर येऊन पडले होते. उष्माघातामुळे अनेकांची प्रकृती बिघडली, त्यापैकी १४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र, याच कार्यक्रमासाठी सरकारने कोट्यवधी रुपये खर्च केल्याचे बोलले जात असले तरी प्रत्यक्षात यासाठी महापालिकेच्या तिजोरतील पैसा वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या कार्यक्रमासाठी जेवणाची व्यवस्था मुंबई महापालिकेला करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या वतीने तातडीने जेवणाची व्यवस्था करून दिली होती. या जेवणाच्या पुरवठ्यासाठी २३ लाख ३१ हजार रुपये खर्च केले गेले आणि हे काम महापालिकेने स्वस्तिक महिला फाऊंडेशन यांच्याकडून महापालिकेच्या टी. विभागाने करून घेतले होते.

logo
marathi.freepressjournal.in