बदलापूर-मुंबई-नवी मुंबई प्रवास होणार वेगवान; एक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी MMRDA ने मागविल्या निविदा

सध्या रस्तेमार्गे बदलापूरहून मुंबई व नवी मुंबई गाठण्यासाठी सुमारे दीड ते दोन तासाचा अवधी लागतो.
बदलापूर-मुंबई-नवी मुंबई प्रवास होणार वेगवान; एक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी MMRDA ने मागविल्या निविदा
Published on

बदलापूर : सध्या रस्तेमार्गे बदलापूरहून मुंबई व नवी मुंबई गाठण्यासाठी सुमारे दीड ते दोन तासाचा अवधी लागतो. परंतु, आगामी काळात हे अंतर अवघ्या काही मिनिटात कापणे शक्य होणार आहे. बदलापूरहून मुंबई, नवी मुंबई गाठण्यासाठी प्रस्तावित असलेल्या एक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत. या मार्गामुळे डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर ही सर्व शहरे महामार्गाशी थेट जोडली जाणार असल्याने शहरांतर्गत वाहतूक कोंडीमुक्त होऊन प्रवास अधिक वेगवान होण्यास मदत होणार आहे.

वाहतूक व्यवस्थेला गती देण्यासाठी राबविण्यात येत आलेल्या अनेक महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई- नवी मुंबई ते थेट कल्याण, बदलापूर ॲक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीसाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सन २०२३ मध्ये सर्वप्रथम मागणी केली होती. त्यानंतर एमएमआरडीएकडून या मार्गाच्या उभारणीसंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. एमएमआरडीए आयुक्त संजय मुखर्जी यांनीही या मार्गासाठी पुढाकार घेतला होता. बदलापूर, उल्हासनगर, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली या शहरांना थेट मुंबई तसेच नवी मुंबई या शहरांशी कशा पद्धतीने जोडता येईल याची चाचपणी सुरू होती. अखेर एमएमआरडीएने या एक्सेस कंट्रोल महामार्गाच्या उभारणीसाठी प्रकल्प सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याअंतर्गत सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएने निविदा मागवल्या आहेत. हा मार्ग झाल्यास बदलापूर ते नवी मुंबई आणि मुंबई हा प्रवास गतीमान होईल. सध्या बदलापूरहून अंबरनाथ आणि डोंबिवलीमार्गे काटई राज्यमार्गाने शिळफाटा, महापे मार्गे नवी मुंबई गाठावी लागते. तर खोणी तळोजा मार्गेही नवी मुंबईला जाता येते. मुंबईला जाण्यासाठी सुमारे अडीच तासांचा तर नवी मुंबईला जाण्यासाठी सुमारे दीड तासांचा अवधी लागतो. त्याशिवाय शहरांतर्गत प्रवासात वाहन कोंडीचाही या वाहतुकीवरही परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला होता.

नवी कनेक्टीव्हीटी मिळणार

बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, २७ गावे, डोंबिवली, कल्याणचा ग्रामीण भाग या भागाला या मार्गामुळे नवी कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. बदलापूर येथून मुंबई - वडोदरा राष्ट्रीय महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असल्याने नागरिकांना समृद्धी महामार्गालाही जाता येणार आहे. या महामार्गामुळे कल्याणचा दुर्लक्षित भाग केंद्रस्थानी येणार आहे.

असा आहे नियोजित आराखडा

बदलापूर येथून जात असलेल्या मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्गाच्या येथून या रस्त्याची सुरुवात करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. पुढे हा मार्ग पालेगाव, कल्याण पूर्वेतून जात असून हेदुटणे मार्गाला जोडण्याची शक्यता आहे. येथे मेट्रो-१२ ची उभारणी सुरू आहे. तसेच येथून कल्याण रिंग रोडचा प्रकल्पही जोडला जातो. कल्याण-शिळफाटा मार्ग देखील येथून जवळच आहे. पुढे शिरढोण येथे महत्त्वाकांक्षी मल्टी मोड कॉरिडोर महामार्गाला जाता येणे शक्य होईल.

logo
marathi.freepressjournal.in