नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने शनिवारी सकाळी कोपरखैरणेतील खैरणे गावात छापा मारून मागील २० ते २५ वर्षांपासून बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्या ३ महिला व १ पुरुष अशा ४ बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. या चारही बांगलादेशी नागरिकांनी भारतीय ओळखीचा पुरावा असलेले आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवून घेतल्याचे उघडकीस आले आहे.
कोपरखैरणे सेक्टर-१२ मधील खैरणे गावात काही बांगलादेशी नागरिक बेकायदेशीरीत्या वास्तव्य करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे शनिवारी सकाळच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका पाटील व त्यांच्या पथकाने खैरणे बोनकोडे सेक्टर-१२ मधील पॅराडाईज बिल्डिंगमधील संशयीत घरावर छापा मारला. यावेळी मायरा अस्लम मलिक (३५) ही १९९५ मध्ये तिच्या आत्यासोबत घुसखोरीच्या मार्गाने भारतात आल्याचे तसेच नसीमा बेगम बक्कम गाझी (४५) हिने २०१० मध्ये भारत बांगलादेश सीमेवरील बेनापोल-बोनगा सीमेवरील गस्ती पथकाची नजर चुकवून घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरीत्या प्रवेश केल्याचे त्यांच्या चौकशीत उघडकीस आले आहे. तसेच फातिमा फजल्लु खान (४५) व फिरोजा शाहदत मुल्ला उर्फ फिरोजा अनीश शेख (३४) या दोघींनी २००५ ते २०१० या कालावधीत घुसखोरीच्या मार्गाने बांगलादेशातून भारतात प्रवेश केल्याचे आढळून आले आहे. तर अनीश असरुद्दीन शेख (३८) याने देखील २००५ ते २०१० या कालावधीत त्याच्या बहिणीसोबत घुसखोरीच्या मार्गाने भारत बांगलादेश सीमेवरून अवैधरीत्या भारतात प्रवेश केल्याचे चौकशीत आढळून आले आहे. हे सर्वजण अधूनमधून बांगलादेशात नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असल्याचे देखील उघडकीस आले आहे. नातेवाईकांना संपर्क साधण्यासाठी इमो ॲपचा वापर करत असल्याचे समोर आले आहे.
नातेवाईकांना संपर्क साधण्यासाठी इमो ॲपचा वापर
या कारवाईत अटक करण्यात आलेल्या सर्व बांगलादेशी नागरिकांकडे असलेल्या मोबाईल फोनची तपासणी केली असता, ते इमो ॲपचा तसेच व्हॉट्सॲपद्वारे व्हिडीओ कॉलद्वारे बांगलादेशातील आपल्या नातेवाईकांना संपर्क साधत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. या चारही बांगलादेशी नागरिकांविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौघांना अटक करण्यात आली आहे.