
नवी मुंबईतील वाशी तसेच कोपरखैरणे स्थानकाबाहेर बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या आसाराम बापूचे बॅनर झळकले. यामध्ये 'व्हॅलेंटाइन डे' ऐवजी हा दिवस मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करा, असे आवाहन या बॅनरमध्ये करण्यात आले होते. बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यात दोषी ठरलेल्या आसाराम बापूच्या झळकलेल्या या बॅनर्समुळे स्थानिकांकडून संताप व्यक्त करण्यात आला. 'फ्री प्रेस जर्नल'चे पत्रकार सुमित शर्मा यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) NMMC (नवी मुंबई महापालिका कॉर्पोरेशन) च्या अधिकाऱ्यांना टॅग करत कारवाईची मागणी केली, तेव्हा हा मुद्दा चर्चेत आला. त्यानंतर, सोमवारी सकाळी NMMC च्या अधिकाऱ्यांनी वाशी स्थानकावरील बॅनर्स काढून टाकण्यात आल्याचे सांगितले आहे.
'व्हॅलेंटाइन डे' (14 फेब्रुवारी) जवळ आला आहे. हा दिवस साजरा करण्यावर अनेक संस्कृतीवादी लोक आणि संस्थांकडून आक्षेप घेण्यात येतो. आसाराम बापूने आपल्या अनुयायांना हा दिवस मातृ-पितृ पूजन दिवस म्हणून साजरा करण्यात यावा, असा संदेश यापूर्वी दिला होता. तोच संदेश या बॅनरवर झळकत होता. आसाराम बापू याच्या अहमदाबाद आश्रमाकडून जाहिरातीचे हे बॅनर लावले होते.
कारवाईच्या मागणीनंतर NMMC ने काढले वाशी स्थानकाबाहेरील बॅनर
रविवारी पत्रकार शर्मा यांनी बलात्कार प्रकरणात अशाप्रकारे दोषी ठरलेल्या गुन्हेगाराच्या बॅनरबाजीचा निषेध करत सोशल मीडियावर पोस्ट केली होती. सोबतच, एनएमएसीच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करण्याची मागणीही केली होती. "कोपरखैरणे-वाशी स्थानकाबाहेर बलात्कार प्रकरणी दोषी असलेल्याचे 'मातृ-पितृ पूजन दिन' जाहिरातींचे होर्डिंग... लाज वाटावी @NMMCCommr... साहेब कृपया कारवाई करा", असे त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी 'फ्री प्रेस जर्नल'ने याविषयी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता वॉर्ड ऑफिसने वाशी रेल्वे स्टेशनच्या परिसरातील बॅनर काढून टाकल्याची पुष्टी केली. तथापि, कोपरखैरणे येथील बॅनर जाहिरातींबद्दल विचारले असता, वाशी वॉर्ड ऑफिसने अधिकारक्षेत्रातील समस्यांमुळे भाष्य करण्यास नकार दिला.
दिल्ली मेट्रोतही झळकले होते आसाराम बापूचे बॅनर
या महिन्याच्या सुरुवातीला अशाच प्रकारे दिल्ली मेट्रोमध्ये आसाराम बापूचे बॅनर झळकले होते. त्याबाबत सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट करून तक्रार केल्यानंतर दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जाहिरातींचे बॅनर काढण्याचे आश्वासन दिले.
आसाराम बापूचे प्रकरण काय होते?
आसाराम बापूला (वय 83) जोधपूर न्यायालयाने त्याच्याच आश्रमात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवले होते आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 2023 मध्ये, गुजरातच्या एका न्यायालयाने त्याला 2013 मध्ये त्याच्या आश्रमात एका महिला शिष्यावर अनेक वेळा बलात्कार केल्याबद्दल दोषी ठरवले.
डिसेंबर 2024 मध्ये, आसाराम बापूला 17 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आणि जानेवारीच्या सुरुवातीला पुन्हा तुरुंगात परतला. तथापि, वैद्यकीय कारणांमुळे राजस्थान उच्च न्यायालयाने त्याचे वय आणि बिघडणारी प्रकृती यामुळे आसारामला पुन्हा 31 मार्चपर्यंत जामीन मंजूर केला आहे.