
नवी मुंबई : तगड्या बंडखोरीमुळे बेलापूर मतदारसंघाची निवडणूक चुरशीची होणार आहे. त्यामुळे विजयी कोण होणार, याची उत्सुकता या मतदारसंघातील नागरिकांना लागली आहे. ‘भाजपा-महायुती'च्या उमेदवार मंदाताई म्हात्रे, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षचे संदीप नाईक यांच्यात खरी लढत असली तरी विजय नाहटा यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे ‘बेलापूर'ची लढत तिरंगी होणार आहे. त्यामुळे विजयाचे पारडे कोणाच्या बाजुने झुकेल, याची खात्री मतदारदेखील देऊ शकत नाहीत. परिणामी, ‘बेलापूर'ची लढाई तिन्ही उमेदवारांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
‘भाजप'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी विधानसभा निवडणुकीत बेलापूरमधून उमेदवारी न मिळाल्यामुळे ‘भाजप'ला सोडचिठ्ठी देत ‘राष्ट्रवादी'ची तुतारी हातात घेतली. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत बेलापूरमधील ‘भाजप'च्या २५ माजी नगरसेवकांनी देखील राष्ट्रवादी-शरद पवार पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे बेलापूर विधानसभा मतदारसंघात ‘भाजप'ला खिंडार पडल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे ‘शिदे शिवसेने'ला सोडचिठ्ठी देत विजय नाहटा यांनी आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षेला प्राधान्य देत अपक्ष उभे राहून बंडाचे निशाण फडकावले. त्यामुळे ‘बेलापूर'ची लढत अधिक रंगतदार स्थितीत येऊन पोहोचली आहे.
‘बेलापूर'च्या विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यावर ‘भाजपा'ने पुन्हा विश्वास टाकत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्यांची मदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा कार्यकर्त्यांद्वारे घरोघरी प्रचारावर जास्त दिसून आली. त्यामुळे ‘बेलापूर'ची लढत मुख्यत्वे तिरंगी असली तरी ‘मनसे'चे गजानन काळे आणि अपक्ष उमेदवार डॉ. मंगेश आमले यांच्या मताधिक्यावर ‘बेलापूर'मधील विजयी उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ‘मनसे'च्या गजानन काळे यांना जवळपास २५ हजारांहून अधिक मते पडली होती. त्यामुळे निश्चितच यावेळी ‘मनसे'चा आत्मविश्वास अधिक दुणावलेला दिसून येत आहे. विशेष म्हणजे मनसे पक्ष नेतृत्वाकडून मिळालेल्या सहकार्यामुळे ‘मनसे'च्या कार्यकर्त्यांमध्ये अधिक जोष आला आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या ‘राष्ट्रवादी'कडून विधानसभेचे तिकीट मिळेल या आशेवर बसलेल्या डॉ. मंगेश आमले यांचा पक्षाने हिरमोड केल्यामुळे ते देखील अपक्ष उमेदवारी दाखल करुन आपले नशीब आजमावत आहेत. डॉ. मंगेश आमले किती मते खातात, यावर ‘राष्ट्रवादी'च्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.