नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनाऱ्यांना अधिक पसंती; पर्यटकांची गर्दी

नाताळ आणि त्यानंतर येणारे नवीन वर्ष याचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांना प्राधान्य दिले आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी समुद्रकिनाऱ्यांना अधिक पसंती; पर्यटकांची गर्दी
Published on

नाताळ आणि त्यानंतर येणारे नवीन वर्ष याचा आनंद साजरा करण्यासाठी पर्यटकांनी रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांना प्राधान्य दिले आहे. दोन दिवसांपासून हजारोंच्या संख्येने पर्यटक रायगडमधील अलिबाग, दिवेआगार, मुरूड-जंजिरा, श्रीवर्धन किनारपट्टीवर दाखल झाल्याने समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. परिणामी हॉटेल, लॉज, खाद्यपदार्थांच्या दुकानांची चंगळ सुरू झाली आहे.

डिसेंबरचा दुसरा आठवडा संपला की कोकणच्या किनारपट्टीवर पर्यटकांची वर्दळ सुरू होते. दिवाळीच्या सुट्ट्या, त्यानंतर डिसेंबरमधील विद्यार्थ्यांच्या युनिट टेस्ट संपल्यामुळे टेन्शन फ्री झालेले विद्यार्थी आणि वर्ष संपायला आल्याने सुट्टी संपवण्यासाठी तयार झालेले नोकरदार यामुळे पर्यटकांची पावले रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर वळायला लागतात.

पर्यटकांमुळे व्यवसाय तेजीत

अलिबाग तालुक्यातील आवास, सासवणे, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, चौल आणि रेवदंडा येथे अंदाजे २० हजार पर्यटक दाखल झाले आहेत, तर मुरूड तालुक्यातील काशिद, नांदगाव, मुरूड आणि फणसाड येथे १२ हजारांहून अधिक पर्यटक दाखल झाले आहेत. पर्यटकांमुळे स्थानिकांना चांगला रोजगार मिळत आहे. बोट व्यावसायिक, स्टॉलधारक, नारळपाणी विक्रेते यांचे व्यवसाय तेजीत आहेत. इकडे मुरूडमध्येही राजापुरी येथील जंजिरा किल्ला पाहायला पर्यटकांची रीघ लागली आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली असून स्थानिकांचे व्यवसाय तेजीत आहेत.

रेव्ह पार्ट्यांवर पोलिसांची नजर

नंदकुमार ठाकूर/नवी मुंबई

ख्रिसमसपासून ते नव वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरपर्यंत नागरिक हॉलिडे मूडमध्ये असल्यामुळे दररोज विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले जाते. त्यात रेव्ह पार्ट्या देखील छुप्या पद्धतीने आयोजित केल्या जातात. या रेव्ह पार्ट्यांमध्ये अमली पदार्थांचे सर्रासपणे सेवन केले जाते. तसेच मद्यपींचा धुडगूसही मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे थर्टीफर्स्ट र्यंत शहरात कुठलाही अनुचित व अप्रिय घटना घडू नये, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नवी मुंबई पोलिसांची अशा पार्ट्यांच्या आयोजनावर करडी नजर असल्याचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.

नव वर्षांच्या स्वागतासाठी आणि त्या अनुषंगाने आवश्यक बंदोबस्तासाठी नवी मुंबई पोलिसांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. ख्रिसमसपासून थर्टीफर्स्टपर्यंत दररोज ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन केले जात असून अनेक पार्ट्यामध्ये अंमली पदार्थाचा वापर होत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे अंमली पदार्थ पुरविणाऱ्या तस्करांची माहिती काढण्यासाठी पोलिसांचे खबऱ्यांचे नेटवर्क देखील कामाला लागले आहे.

मुरबाडमध्ये खवय्यांची गर्दी

नामदेव शेलार/मुरबाड

३१ डिसेंबर थर्टी फर्स्टसाठी यावर्षी मुंबईसह शहरी भागातील पर्यटकांनी मुरबाड तालुक्यातील बंगलो, फार्म हाऊस, रिसॉर्ट, हॉटेल, धाबे इत्यादी पर्यटनस्थळांना जास्त पसंती दिली जात आहे. मुरबाड तालुक्यात बारवी डॅम, बदलापूर म्हसा, धसई, नाणेघाट, सरळगाव, मुरबाड, टोकावडा, तळेगाव, थिदवी, मोरोशी, वैशाखरेसह माळशेज घाटातील पर्यटन केंद्र फुल्ल झाले आहेत. या नव वर्षाच्या पार्टीत चिकन, मटन आणि मच्छीला अधिक पसंती दिली जाणार असल्याने त्याची बुकिंग झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे. ३१ डिसेंबरच्या सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी शहरात वास्तव्यास असणारे तसेच चाकरमानी मुरबाडकडील खेडेगावी परत येऊ लागली आहेत.

माळशेज घाट नाणेघाट बारवी डॅम या तीन ठिकाणी एक दिवसाचे वनभोजन करणारे फॅमिली पर्यटक कपल मोठ्या प्रमाणात जातात गतवर्षी सुद्धा तेथे पर्यटकांची गर्दी फुलून दिसणार आहे. त्याचबरोबर मुरबाड येथे खवय्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्यामुळे प्रशासन आणि हॉटेल व्यावसायिक सज्ज झाले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in