प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या, प्रियकराचा मृतदेह सापडला खाडीत

भाविका व स्वस्तिक या दोघांमध्ये प्रेम प्रकरणात झालेल्या भांडणातून स्वस्तिकनेच भाविकाची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.
प्रेयसीची हत्या करून प्रियकराची आत्महत्या, प्रियकराचा मृतदेह सापडला खाडीत
प्रतिकात्मक फोटो
Published on

नवी मुंबई : सीवूडसमधील डीपीएस शाळेलगतच्या खाडीजवळ भाविका मोरे (१९) या तरुणीची हत्या करून स्वत: खाडीमध्ये उडी मारून आत्महत्या करणाऱ्या स्वस्तिक पाटील (२२) याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी एनआरआय वसाहती लगतच्या खाडीमध्ये आढळून आला. त्यानंतर भाविका व स्वस्तिक या दोघांमध्ये प्रेम प्रकरणात झालेल्या भांडणातून स्वस्तिकनेच भाविकाची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे.

या घटनेतील मृत भाविका मोरे ही सीवूड्समध्ये राहत होती, तर तिचा प्रियकर स्वस्तिक पाटील हा मूळचा उरणच्या केळवणे गावातील रहिवासी असून सध्या तो पनवेल येथे राहत होता. तसेच पनवेलमधील मेडिकल स्टोअर्समध्ये तो काम करत होता. भाविका व स्वस्तिक या दोघांमध्ये मागील वर्षभरापासून प्रेमसंबध सुरू होते. चार महिन्यांपूर्वी या दोघांमध्ये वाद झाल्याने त्यांच्यामध्ये ब्रेकअप झाले होते. त्यामुळे भाविका स्वस्तिकला भेटण्यास टाळाटाळ करत होती. मात्र स्वस्तिक तिला भेटण्यासाठी बोलवत होता. घटना घडायच्या तीन-चार दिवसापूर्वी देखील ते दोघे भेटले होते. त्यावेळी सुद्धा त्यांच्यामध्ये भांडण झाले होते. गत बुधवारी देखील स्वस्तिकने भाविकाला भेटण्यासाठी बोलावले असता दोघे दुचाकीवरून सीवूड्स येथील डीपीएस तलावालगतच्या खाडीकिनारी गेले होते. याठिकाणी त्यांच्यामध्ये पुन्हा भांडण झाले. या भांडणामध्ये स्वस्तिकने भाविकाची गळा दाबून व डोक्यात दगड घालून हत्या केली. त्यानंतर स्वत: देखील खाडीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली. त्यावेळी खाडीमध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांनी स्वस्तिकला खाडीमध्ये उडी टाकताना पाहिले होते. त्यामुळे त्याचा शोध घेत असताना मच्छीमारांना भाविकाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भाविकाचा मृतदेह ताब्यात घेतला. मात्र, त्यावेळस खाडीमध्ये ओहोटी सुरू असल्यामुळे स्वस्तिकचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला नव्हता. अखेर शुक्रवारी सकाळी एनआरआय वसाहती लगतच्या खाडीकिनारी त्याचा मृतदेह आढळून आला.

logo
marathi.freepressjournal.in