खळबळजनक! पुढच्या जन्मी पुन्हा एकत्र येण्याचा विश्वास, प्रेयसीची हत्या करून प्रियकराचीही आत्महत्या

कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने खारघर येथील टेकडी परिसरात गळा आवळून हत्या केल्याची व त्यानंतर त्याने स्वत: देखील जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ लोकलसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस...
खळबळजनक! पुढच्या जन्मी पुन्हा एकत्र येण्याचा विश्वास, प्रेयसीची हत्या करून प्रियकराचीही आत्महत्या

नवी मुंबई : कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या १९ वर्षीय तरुणीची तिच्याच प्रियकराने खारघर येथील टेकडी परिसरात गळा आवळून हत्या केल्याची व त्यानंतर त्याने स्वत: देखील जुईनगर रेल्वे स्थानकाजवळ लोकलसमोर उडी घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना महिन्याभरानंतर उघडकीस आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने खारघर टेकडी परिसरात १० दिवस अथक शोध मोहीम राबवून तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह शोधून काढल्यानंतर या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे.

या घटनेतील मृत वैष्णवी मनोहर बाबर (१९) ही तरुणी कळंबोली सेक्टर-१ मध्ये कुटुंबासह राहण्यास होती. तसेच ती मुंबईतील सायन येथील महाविद्यालयात शिक्षण घेत होती. तर तिची हत्या करणारा तिचा प्रियकर वैभव बुरुंगले (२४) हा देखील कळंबोली राहत होता. या दोघांचे मागील ५ वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. गत १२ डिसेंबर रोजी वैष्णवी रात्री उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिच्या आईने कळंबोली पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल केली होती. कळंबोली पोलिसांकडून बेपत्ता वैष्णवीचा शोध सुरू असताना, त्याच दिवशी वैष्णवीचा प्रियकर वैभव बुरुंगले याने सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास जुईनगर रेल्वे स्टेशनजवळ लोकलसमोर उडी घेत आत्महत्या केली होती. तसेच त्याच दिवशी वैभव याने वैष्णवीची हत्या करून जुईनगर रेल्वे स्टेशन येथे आत्महत्या केल्याचे त्याच्या मोबाईलमधील सुसाईड नोटवरुन उघडकीस आले.

सुसाईड नोटस मधील सांकेतिक शब्द (एल ०१-५०१) मुळे लागला तरुणीच्या मृतदेहाचा शोध वैभव हा १२ डिसेंबर रोजी सायन येथे वैष्णवीच्या कॉलेजमध्ये गेला होता. त्यानंतर त्याने तिला सोबत घेऊन खारघर टेकडीवरील दुर्गम झुडपात नेले होते. त्याठिकाणी त्याने पॅकिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या पट्टीच्या सहाय्याने वैष्णवीची गळा आवळून हत्या केली. ज्या झाडाजवळ वैभवने वैष्णवीची हत्या केली. त्या ठिकाणावरील झाडांच्या मोजणीसाठी वन विभागाने (एल ०१-५०१) टाकलेला नंबर वैभवने आपल्या सुसाईड नोटमध्ये शेवटी टाकला होता. एल ०१-५०१ या सांकेतिक शब्दाचा अर्थ पोलिसांना सुरुवातीला लक्षात आला नाही. त्यामुळे पोलिसांनी १० दिवस येथील दुर्गम भागात वेगवेगळ्या माध्यमातून वैष्णवीच्या मृतदेहाचा शोध घेतला; मात्र त्यांना मृतदेह सापडला नाही. पोलिसांनी नंतर वन विभागाच्या मदतीने एल ०१-५०१ या नंबरच्या झाडाचा शोध घेतल्यानंतर त्याच झाडाजवळ वैष्णवीचा कुजलेला मृतदेह सापडला.

पुढच्या जन्मी पुन्हा एकत्र येण्याचा वैभवचा विश्वास

वैभवने मागील तीन महिन्यापासून वैष्णवीच्या हत्येची योजना आखल्याचे त्याने लिहून ठेवलेल्या ८ पानी चिठ्ठीमधील मजकुरावरुन आढळून आले आहे. त्यात त्याने पुढच्या जन्मी पुन्हा एकत्र येण्यासाठी ज्या दिवशी वैष्णवीची हत्या करणार, त्याच दिवशी तो देखील जीवन संपवणार असल्याचे त्याने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे वैभव याने लोकलसमोर आत्महत्या करण्यापूर्वी देखील आपल्या मोबाईलवर मेसेज टाईप करून वैष्णवीची हत्या केल्याचे तसेच सदरचा मोबाईल आपल्या कुटुंबीयांना अथवा पोलिसांना देण्यास सांगितल्याचे आढळून आले आहे.

वैभव आणि वैष्णवी या दोघांमध्ये पाच वर्षापासून प्रेमसंबध सुरू होते. त्यामुळे या दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता; मात्र दोघांची जात वेगळी असल्याने त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यातच मागील काही महिन्यांपासून वैष्णवीला एका तरुणाचा फोन येत होते. त्यामुळे वैष्णवी त्या तरुणाच्या संपर्कात असल्याचा वैभवला संशय होता. यावरून दोघांमध्ये भांडण देखील होत होते. यावरून वैष्णवी आपल्यापासून दुरावत असल्याच्या वैभवला संशय होता.

-अमित काळे (पो.उपआयुक्त गुन्हे शाखा)

logo
marathi.freepressjournal.in